नगर : सरकारमुळेच दुधाला 33 रुपये भाव : मंत्री विखे

नगर : सरकारमुळेच दुधाला 33 रुपये भाव : मंत्री विखे
Published on
Updated on

खंडाळा : पुढारी वृत्तसेवा : मागिल सरकार असताना दुधाला 22-23 रुपये भाव होता. आता 32-33 रुपये आहे. लवकरचं पशुखाद्याचे उत्पादकांची बैठक बोलावून खाद्याचे दर कमी करण्यास त्यांना भाग पाडू, असे आश्वासन देत, शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राज्य सरकारने सुरू केला, परंतू गावोगावच्या समस्या पाहता 15 जूनपर्यंतची मुदत 31 ऑगष्टपर्यंत वाढविल्याची माहिती महसुल, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे हनुमान मंदिर प्रांगणात शासन आपल्या दारी उपक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पालकमंत्री म्हणून या उपक्रमानिमित्त अनेक ठिकाणी सर्व विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत नागरिकांच्या समस्यांचा ओघ पहायला मिळाला.

सर्वांचेच प्रश्न वेळेत संपणार नाहीत, म्हणून या उपक्रमाचा कालावधी वाढविला आहे. मंत्री विखे पा. यांनी प्रथम महिलांच्या लेखी समस्या स्विकारून तोंडी प्रश्न समजावून घेतले. अधिकार्‍यांना समस्या सोडविण्याच्या सुचना केल्या. ग्रामस्थांनी निवेदने दिली. अर्जासह निवेदनावर काय कार्यवाही केली, याबाबत दिलेल्या भ्रमणध्वनीवर कळविण्यात येईल. घरकुल, रेशन कार्डसाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र कॅम्प घेण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात अडचणींचा निपटारा करण्यास, गायरान जमिनी देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. गावठाण जागेसाठी महामंडळाच्या जमिनीची मागणी ग्रामपंचायतीने करावी. शासन आपल्या दारी गेल्याशिवाय लोक दारात येणार नाही, तेव्हा अधिकार्‍यांनी जमिनीवर राहून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आयुष्यमान भारत ही 5 लाखापर्यंत रुग्णालयासाठी अर्थसाह्य देणारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे शेतकर्‍यांचा पीक विमा राज्य सरकार भरणार आहे. लम्पीवर राज्य सरकारने मोफत लसीकरण करून संसर्ग नियंत्रणात आणला. भूमि अभिलेखकडून अद्ययावत पद्धतीने मोजणी कमी कालावधीत होणार आहे. घरकुल योजनेसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळत आहे, असे ते म्हणाले.

दूध भेसळीवर लक्ष केंद्रित केल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात 60 हजार लिटर दूध कमी झाले. दूध भेसळ करणार्‍यांच्या साखळीचा बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अ. नगरसह सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व माझ्याकडे असल्यामुळे यावर्षी वारकर्‍यांची वारी अधिक सुखकर कशी होईल, यासाठी नियोजन केले आहे. एकट्या अ. नगर जिल्ह्यातून 260 दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. 2 लाखापेक्षा जास्त भावीकांचा दिंडीमध्ये समावेश असतो. दिंडी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, वारकरी मुक्कामासाठी शाळा, मंगल कार्यालये, कार्डियाक अ‍ॅम्बुलन्स, औषधोपचार, डॉक्टर पथक, फिरते शौचालय आदी व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरपुरमध्ये चंद्रभागा नदीची साफसफाई सुरु असल्याचे मंत्री विखे म्हणाले. आभार 'श्रीगणेश'चे संचालक अण्णासाहेब सदाफळ यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news