नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने महसूल विभागात तलाठी संवर्गातील जवळपास पाच हजार पदे सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 250 पदांचा समावेश आहे. यामध्ये 202 नवीन तर 48 रिक्त पदांचा समावेश आहे. या सरळसेवा भरतीमुळे बेरोजगार पदवीधर युवकांना दिलासा मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तलाठी संवर्गातील एकूण 586 पदे मंजूर आहेत. मध्यंतरी शासनाने आणखी 202 पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे तलाठी पदांची संख्या आता 788 झाली आहे. 202 पदे मंजूर होण्यापूर्वी 48 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे आणि नव्याने मंजूर झालेली 202 अशी एकूण 250 पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. राज्यात देखील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पदे रिक्त असल्यामुळे महसुली कामकाजावर परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे कार्यालयाच्या वतीने महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गाची एकूण 4 हजार 797 पदांची सरळसेवा भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रारुप जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक 383, नाशिकसाठी 268 पदे भरली जाणार आहे. या दोन जिल्ह्यांच्या खालोखाल नगर जिल्ह्यात 250 पदे भरली जाणार आहेत. तलाठी संवर्गाची पदे मोठ्या प्रमाणात भरण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार पदवीधर युवकांना नोकरीसाठी आशेचा किरण मिळाला आहे. या पदासाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
हे ही वाचा :