संगमनेर शहर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : थोरात कारखान्यासह संगमनेरमधील सहकारी संस्थांचे काम चांगले असल्याने संगमनेर सहकाराचे मॉडेल ठरले आहे. शेतकर्यांना चांगला भाव देणे व कर्मचार्यांना चांगले पगार देणे हे कारखान्यासाठी महत्त्वाचे आहे. सध्या सर्वत्र विकासाऐवजी होत असलेले धार्मिकतेचे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 गाळप हंगामाच्या पहिल्या रोलरचे पूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, रमेश गुंजाळ, विनोद हासे आदीं उपस्थित होते.
बोलताना आ. थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या काटकसर, पारदर्शकता या तत्त्वावर काम सुरू आहे. संगमनेरचा सहकार हा राज्याला दिशादर्शक असून या संस्थांमुळे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. कारखान्याचे यश हे शेतकर्यांना दिला जाणारा उसाचा भाव व कामगारांचे पेमेंट यावर अवलंबून असते. तालुक्यात सुसंस्कृत व प्रगतीचे वातावरण आहे. मात्र हे चांगले वातावरण काहींना पाहवत नाही, म्हणून हेतू परस्पर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. .विकासकामे थांबवता येत नाही, मग धार्मिकतेचे राजकारण केले जाते.
गुन्हेगारांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, या मताचे आपण आहोत. मात्र त्याची संधी शोधून धार्मिकतेचे राजकारण नको. दिल्लीमध्ये महिला खेळाडू अनेक दिवसांपासून आंदोलन करतात त्याबाबत एकही पदाधिकारी बोलायला तयार नाही सोशल मीडियावर बोलणारे ही गप्प असतात. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. देशाच्या विकासासाठी सर्वधर्मसमभाव व राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे ही आवश्यक आहे. आभार प्रदर्शन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मानले.
तालुक्यातील संस्थांमुळे आनंद
संगमनेर तालुक्यातील महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासह असलेल्या सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे संगमनेर तालुक्यातील सहकार राज्याला दिशादर्शक ठरला आहे. तालुक्यातील या सहकारी संस्थामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला.
हे ही वाचा :