पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुका सैनिक बँकेच्या उपविधी दुरूस्तीला सहकारमंत्री अतुल सावे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह आठ हजार सभासदांना अपात्र ठरविण्याचा डाव उधळला गेला आहे. स्थगितीमुळे सर्व सभासद मतदानास पात्र आहेत, असे बाळासाहेब नरसाळे यांनी सांगितले. सदर उपविधी दुरूस्तीमुळे बहुसंख्य सभासद निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. तसेच सैनिक बँकेने उपविधी दुरूस्ती केल्यावर ती सभासदांना वैयक्तिक नोटीसने कळविली नाही व सभासदांनाही उपविधीप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करण्यास वाजवी संधी दिली नसल्याची खात्री सरकारला झाल्याने, सहकारमंत्री सावे यांनी सहकार आयुक्तांनी सैनिक बँकेच्या उपविधी बदलास दिलेल्या मंजुरीस स्थगिती दिली असल्याची माहिती सभासद बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ यांनी पारनेर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संस्थापक अण्णा हजारे यांच्यासह जवळजवळ 8 हजार सभासदांना उपविधीचा डाव टाकून अपात्र करण्याचा प्रयत्न सुरू होता. संजय कोरडे, शिवाजी व्यवहारे, तसेच काही विद्यमान सह्याजीराव संचालकांनी टाकलेला डाव असफल झाला असून, सैनिक बँकेचे सर्व संस्थापक सभासद पात्र झाले आहेत. सैनिक बँकेची नुकतीच 4148 पात्र मतदान प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात जवळजवळ 8 हजार सभासद अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे सभासद बाळासाहेब नरसाळे यांनी सहकार मंत्र्यांकडे दाद मागितली होती. त्यावर 31 मे रोजी सहकारमंत्र्यासमोर सुनावणी झाली.
त्यात बँक संचालकांचा उपविधी दुरूस्तीचा उद्देश व्यापक व सभासद हिताचा नाही. सैनिक बँकेने उपविधी दुरुस्ती करताना सभासदांना वैयक्तिक नोटीसने कळविले नाही. तसेच, सभासदांनाही उपविधी प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करण्यास वाजवी संधी दिली नाही, असा युक्तिवाद नरसाळे यांनी सहकार मंत्र्यांसमोर केला. 8 हजार सभासदांच्या वतीने बाळासाहेब नरसाळे व सैनिक बँकेच्या वतीने अॅड माणिकराव मोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन कायद्याचा आधार घेत सहकारमंत्री अतुल सावे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, बँकेची मंजूर केलेली उपविधी दुरुस्ती बहुसंख्य सभासदांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची शक्यता असल्यामुळे प्रथम दर्शनी अन्यायकारक वाटते.
सदस्यत्वाच्या हक्काचा वापर करण्यासाठी सैनिक बँकेने सभासदांना वैयक्तिकरित्या कळविले नाही व सभासदांना वाजवी संधी दिली नाही. कोविडमुळे अनेकांना शेअर्स, मुदतठेव पावती, वार्षिक सभा उपस्थिती बाबत अटींची पूर्तता करता आली नसल्याची खात्री पटल्याने बँकेच्या पोटनियम क्रमांक 15 व 40 मध्ये प्रस्तावित केलेली पोटनियम दुरुस्ती मंजूर करण्याच्या आदेशांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे. पुढील सुनावणी 5 जुलै 2023 रोजी ठेवण्यात आली आहे.
यावेळी विक्रमसिंह कळमकर, मारूती पोटघन, दत्तात्रय भुजबळ, विनायक गोस्वामी, विद्यमान संचालक बबनराव सालके, सुदाम कोथिंबीरे, अरूण रोहकले, संतोष यादव, बबनराव दिघे, दादा पठारे आदी उपस्थित होते.
समविचारींना एकत्र करून निवडणूक लढणार बँकेतील विद्यमान संचालक मंडळाने बँकेची प्रतिमा मलीन केली आहे. त्यांच्याविषयी सभासदांमध्ये नाराजी आहे. सत्ताधार्याचें वर्चस्व मोडीत काढण्यासाठी व सैनिक बँकेची मलीन झालेली प्रतिमा पुन्हा उजळविण्यासाठी बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब नरसाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय समविचारी लोकांना एकत्र घेवून व सैनिक बँकेच्या जडणघडणीत योगदान देणार्या सर्व माजी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल गठीत करीत निवडणूक लढविली जाईल, असे विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले.
गैरव्यवहार झाकण्यासाठी सभासद वाढ
बँकेत शिवाजी व्यवहारे, संजय तरटे यांनी गेली 5 वर्षे काही सयाजीराव संचालकांना व भ्रष्टाचारात गुंतलेल्या सातआठ कर्मचार्याना हाताशी धरत पदाच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार करत बँकेला अधोगतीकडे नेले. अनेक गैरव्यवहार केले. स्वत:चे नातेवाईक सेवक म्हणून घेतले. एकाच दिवशी नियमबाह्य 1405 सभासद केले आणि त्याच बळावर 8 हजार सभासद अपात्र करून बँक ताब्यात घेण्याचे मनसुबे आखले. अशा भ्रष्टाचारी लोकांना सत्तेतून घालवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्वपक्षीय पॅनल करत असल्याचे बाळासाहेब नरसाळे यांनी सांगितले.