
शशिकांत भालेकर
पारनेर : फळांचा राजा आंबा आणि त्यातच कोकणी हापूस आंबा म्हटले की, जिभेला पाणी येणार; परंतु कृत्रिम पिकवल्या जाणार्या आंब्यांना नैसर्गिक चव राहिली नाही. मात्र, पारनेर तालुक्यातील मावळेवाडी येथील कुरकुटे वस्तीवरील शेतकर्यांनी माळरानावर कोकणचा हापूस आंब्याची बाग फुलवली आहे. कोकणाच्या हापूसची चव मावळेवाडी ग्राहकांना मिळू लागली आहे. आंब्यांनी खवय्यांना चांगलीच भूरळ घातली आहे.
मावळेवाडीतील कुरकुटे वस्ती येथील शेतकरी संजय गोविंद कुरकुटे यांनी आपल्या 15 एकर शेतीत परंपरागत शेतीला फाटा देत गेल्या 20 ते 22 वर्षापासून तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक पिके न घेता फळबागेवर भर दिला. त्यांनी 15 एकर शेतात डाळिंब 3.5, सिताफळ चार, मोसंबी तीन, अंबा दोन, पेरू 1.5, असे विविध फळबाग केली.
बागेचे योग्य व्यवस्थापन, खत आणि पाण्याचे चांगले नियोजन केल्याने आंब्याची झाडे फळांनी लगडली आहेत. सध्या एक एकरातील 40 आंब्याच्या झाडांना कैर्या लागल्या आहेत. कैर्या पाडी लागल्याने उतरवणे सुरू आहे. मात्र, मार्केटमध्ये न नेता घरीच ग्राहक येऊन कैर्या घेऊन जात आहेत. शिरूर व नगर येथून ग्राहक येतात. लागवड ते उत्पादन दरम्यान रासायनिक फवारणी न करता पूर्णतः नैसर्गिक शेती प्रयोगातून शासकीय मदतीशिवाय ही बाग उभी आहे. शुद्ध फळांना राज्यभरातून मागणी असते
पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर करून ही आंब्याची बाग वाढवण्यात आली. 2002 साली संजय गोविंद कुरकुटे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माळरानावर आंब्याची बाग लावली. पूर्ण सेंद्रिय आणि नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या बागेत आंबा चांगलाच लागला आहे. विशेष म्हणजे हा आंबा लवकर बाजारपेठेत दाखल झाल्याने शेतकर्याला चांगले उत्पन्नही मिळण्याची आशा आहे. आंब्यासोबत इतरही फळबागा असल्याने कुरकुटे यांना वर्षाकाठी जवळपास 35 ते 40 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यातून 10 लाख रुपये खर्च वजा जाता 25 ते 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळतो.
ग्रामीण भागातला शेतकरी आता शिकला सवरलेला आहे. त्यामुळे त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन कमी खर्चात, कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घ्यायचे याचा विचार करणे गरजेचे आहे. उत्पादन चांगले रसायनविरहित असेल आणि सेंद्रिय खतांचा वापर केला गेला असेल तर शेतमालाच्या विक्रीसाठी जाहिरातही करावी लागत नाही. व्यापारी जागेवर येऊन माल घेऊन जातात.
– संजय कुरकुटे, प्रगतशील, शेतकरी
हेही वाचा: