
वाळकी (नगर), पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील घोसपुरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाला असून, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी तक्रार लाभ क्षेत्रातील गावांमधील सरपंच व पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्याकडे मंगळवारी (दि.6) दुपारी केली आहे.
निवेदनात म्हटले की, तालुक्यातील 18 गावांसाठी असलेल्या घोसपुरी पाणी योजनेचा कारभार 15 वर्षांपसून संदेश कार्ले व जिल्हा परिषदेच्या भोसले नावाचा कर्मचारी, असे दोघेजण बेकायदेशीर पाहत आहेत. यातील संदेश कार्ले अध्यक्ष असून, भोसले सचिव आहेत. अध्यक्षपदावरील कार्ले यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही, तर सचिव असलेले भोसले यांची 7 ते 8 वर्षापूर्वी नगरहून पारनेरला बदली झाली आहे. तरीही ते दोघे बेकायदेशीर अध्यक्ष व सचिवपदाचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे या योजनेस अनियमीतता व भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष देत नाहीत. संदेश कार्ले योजनेचे अध्यक्ष झाल्यापासून सुरुवातीचे 12 वर्ष कोणत्याही प्रकारचे लेखा परीक्षण करण्यात आले नाही.
तक्रारी झाल्यानंतर संगनमताने लेखा परीक्षण उरकण्यात आले. योजनेसाठी वर्षभर लागणारे दुरुस्तीचे साहित्य व मालाच्या खरेदीबाबत कुठल्याही निविदा ऑनलाईन प्रसिद्ध न करता टप्याटप्प्याने व तुकडा तुकड्याने खरेदी केले जात असल्याने त्यात भ्रष्टाचारास वाव मिळतो. खरेदी करण्यात आलेल्या साहित्यच्या गुणवत्तेची तपासणी न करता त्याची देयके दिली गेली. निविदा प्रसिद्ध न करता खरेदी केल्याने त्यातून जास्त दर दिला गेला. त्यामुळे योजनेचा तोटा झाला आहे. या योजनेचा कारभार सुरू असून, बेकायदेशीर अध्यक्ष व सचिव यांना तत्काळ पदमुक्त करावे, योजनेच्या दप्तराचा पंचनामा करून विशेष तपासणी व लेखा परीक्षण करण्यात यावे. याबाबींची सखोल चौकशी करून आढळून आलेल्या भ्रष्टाचार व अनियमिततेला जबाबदार धरत संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, दिलीप भालसिंग, दादासाहेब दरेकर, रवींद्र कडूस, सुधीर भापकर, रेवणनाथ चोभे, अभिलाष घिगे, दीपक कार्ले, मोहन गहिले, बाळासाहेब ठोंबरे, नाना बोरकर, संतोष सकट, रावसाहेब रणसिंग आदी उपस्थित होते.
तक्रार अर्जावर सरपंच शरद बोठे (वाळकी), दीपाली भापकर (राळेगण), नमिता पंचमुख (बाबुर्डी घुमट), विठ्ठल दळवी (सोनेवाडी), बाळासाहेब ठोंबरे (तांदळी वडगाव), युवराज कार्ले (चास), इंदूबाई रणसिंग (वडगाव तांदळी), आरती कडूस (सारोळा कासार), नंदा खेंगट (बाबुर्डी बेंद), स्वाती गहिले (अरणगाव), मंगल सकट (गुंडेगाव), प्रतिक शेळके (अकोळनेर), अनुजा काटे (हिवरे झरे), हरिभाऊ बुलाखे (देऊळगाव सिद्धी) यांच्या सह्या आहेत.
पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य टाकीजवळ व इतर काही टाक्यांजवळ दररोज खासगी टँकर भरून दिले जात असून, त्यातून लाखोंची कमाई केली जात आहे. तसेच, योजनेसाठी खरेदी केलेली टिसीएल पावडर व पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे रसायने खासगी मासेमारी करणार्या ठेकेदाराला विकले जाते. यामुळे या रसायनांचा वापर पाणी शुद्धीकरणा ऐवजी विसापूर तलावातील मासे बेशुद्ध करून ते पकडण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
हेही वाचा: