संगमनेर : काँग्रेस पक्ष नव्या जोमाने उभारी घेईल : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

संगमनेर : काँग्रेस पक्ष नव्या जोमाने उभारी घेईल : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : सध्या महाराष्ट्रात वातावरणात बदल होत आहे. काँग्रेस पक्षाबद्दल पुन्हा एकदा जनतेत अनुकूलता निर्माण होत असून आगामी काळात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभारी घेईल, असा विश्वास माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ थोरात कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी राजेंद्र नागवडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, थोरात कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षताई रुपवते, सचिन गुजर, संपतराव म्हस्के, मधुकरराव नवले, प्रतापराव शेळके, हेमंत उगले, जयवंत वाघ, भैय्या वाबळे, मिलिंद कानवडे, सुरेश झावरे, सचिन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचे विकासाचे हित जोपासणारा पक्ष असून या पक्षाने कायम समतेचा विचार अंगीकृत केला आहे. आव्हाने व अडचणी या काँग्रेस पक्षासाठी नवीन नसून पुढील काळात काँग्रेसला चांगले दिवस येणार आहे. काँग्रेस पक्षात तरुणांनाही संधी आहे.

सत्काराला उत्तर देताना नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की, संघर्ष हा काँग्रेस पक्षाला नवीन नाही. पुढील काळातही पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सध्याच्या सरकारवर जनतेची तीव्र नाराजी असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मधुकरराव नवले करण ससाणे, ज्ञानदेव वाफारे, लताताई डांगे आकाश नागरे, भैय्या वाबळे, प्रशांत दरेकर, सुरेश मेसे, सचिन गुजर यांची ही भाषणे झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले. तर आभार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी मानले.

सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण व सरकार जनतेला मान्य नसून आता जनतेतही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाबद्दल अनुकूलता निर्माण होत आहे.

                                                             – आ. बाळासाहेब थोरात

Back to top button