नगर : ‘कांदा भाववाढीनंतर दंगा करणारे गायब : खा. शरद पवार

नगर : ‘कांदा भाववाढीनंतर दंगा करणारे गायब : खा. शरद पवार
Published on
Updated on

पारनेर / निघोज : पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे भाजपावाले भाव पडल्यावर कांद्याकडे ढुुंकूनही पहायला तयार नसल्याची टीका राष्ट्रवादी काँंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. कांदा, ऊस तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्याच्या हितासाठी काही ना काही केले पाहिजे. त्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या आ. नीलेश लंके यांनी सतत सामान्य माणसाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न केल्याचे गौरवोद्गगारही पवार यांनी काढले. आ. नीलेश लंके यांचा वाढदिवस, निघोज पतसंस्थेचे बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्था असे नामकरण, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे लोकार्पण, 40 बेरोजगारांना व्यवसायिक वाहनांचे वितरण, 100 गरीब कुटूंबांना घरकुलांचे वितरण तसेच 7 हजार गरीब विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

खा. पवार म्हणाले, आज सबंध देशातील शेती, शेती अर्थव्यवस्था संकटाच्या काळातून जात आहे. महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे पिक आहे. उसाचे टनेज कमी येत आहे. भावाचीही खात्री नाही. तीन दिवसांनी लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. दिल्लीला गेल्यानंतर कांदा, ऊस तसेच शेतकर्‍यांचे अन्य प्रश्न यांची मांडणी संसदेत, केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांंडण्याची कामगिरी मी आणि सहकार्‍यांकडून केली जाईल. आज कांद्याचा यक्ष प्रश्न आहे. कांदा हे जिरायत शेतकर्‍यांचे पीक आहे. केंद्रीय कृषी मंत्री असताना कांद्याची निर्यात केली. दिल्लीत कांद्याचे भाव चढले. संसदेत भाजपाचे खासदार कांद्याच्या माळा घालून निषेध करू लागले.

मात्र शेतकरी वर्गाला कधीतरी दोन पैसे मिळाले तर माळा घालून निषेध करण्याचे नाटक कशासाठी? असा प्रश्न त्यावेळी मी मांडला. कांद्याचे भाव वाढले म्हणून तेव्हा दंगा करणारे आज मात्र कांद्याचे दर पडले त्यावेळी त्याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नसल्याची टीका पवार यांनी केली. आ. लंके यांच्या चांगुलपणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव घेतले जाते. कोरोनाचे संकटात देशातील लोक अस्वस्थ होते. पारनेरचे चित्र मात्र वेगळे होते. लंके यांनी सर्व रूग्णांची व्यवस्था केली. मदत केंद्र उभे केले. या काळात ते घरीही गेले नाहीत. अखंडपण रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही भूमिका घेउन त्यांनी काम केले, असे सांगत खा. पवार यांनी आ. लंके यांचे कौतूक केले.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, पोपटराव गावडे, राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरूण कडू, घनश्याम शेलार, वसंत कवाद, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, सुरेश बापडे, राहुल सागर, भैरवनाथ काळे, मच्छिंद्र लंके, काकासाहेब कोयटे, अशोक सावंत, अर्जुन भालेकर, बाबाजी तरटे, प्रशांत गायकवाड, राणीताई लंके, ज्ञानदेव लंके, दिपक लंके, अ‍ॅड. राहूल झावरे, कारभारी पोटघन, शिवाजी लंके, विजय औटी, सचिन गवारे, दत्ता लाळगे, कैलास गाडीलकर, अनिल गंधाक्ते, सचिन पठारे, पुनम मुंगसे, अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे, ठकाराम लंके, किसन जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, गणेश औटी, डॉ. आबासाहेब खोडदे, नामदेवराव थोरात, सुशिलाताई ठुबे, चंद्रकांत लामखडे, प्रभाकर कवाद, शांताराम लंके यावेळी उपस्थित होते.

शेतकर्‍याने आत्महत्या करायची का ?
एक एकर कांद्यासाठी 70 हजार रूपये खर्च येतो. एक किलो कांदा पिकविण्यासाठी 8 ते 10 रूपयांचा खर्च येत असताना 3 ते 4 रूपये भाव झाल्यावर शेतकर्‍याने आत्महत्या करायची का?, त्याचा संसार कसा चालायचा? त्यांनी बँकांचे कर्ज कसे फेडायचे? असे प्रश्न उपस्थित करत केंद्र तसेच राज्य सरकारला आग्रही भूमिका घ्यायला लावणे हे कर्तव्य असल्याचे पवार म्हणाले.

फक्त सायकलवर बसणारा आमदार !
आ. लंके यांना विमान व हेलिकॉप्टरमध्ये बसवून मी घेऊन गेलो. विमानात, हेलीकॉप्टरमध्ये बसल्यावर कसे वाटते? असे विचारल्यानंतर प्रथमच बसल्याचे त्यांनी सांगितले. असा हा आमदार उभ्या आयुष्यात कधी विमानात बसला नाही. हेलिकॉप्टरमध्ये बसला नाही. तो बसला फक्त सायकलवर! सायकलवर बसून लोकांची सेवा करण्यासाठी आपले जीवन आहे, ही भूमिका घेऊन अखंडपणे काम करण्याचे व्रत आ. लंके यांनी घेतल्याचे खा. पवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news