वाळकी : आकडा टाकून दोन वर्षांपासूनची वीजचोरी | पुढारी

वाळकी : आकडा टाकून दोन वर्षांपासूनची वीजचोरी

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : विजेच्या खांबावरून वीज मीटरपर्यंत येत असलेल्या केबलला मध्येच कट मारून त्यावर आकडा टाकून सुमारे दोन वर्षांपासून सुरू असलेली वीजचोरी महावितरणच्या पथकाने रंगेहाथ पकडली. ही वीजचोरी पकडल्यानंतर नियमाप्रमाणे दंड करून ती रक्कम भरण्यास मुदत देऊनही वीजचोरी करणार्‍याने ती न भरल्याने महावितरण अधिकार्‍यांनी त्या वीज चोरावर गुन्हा दाखल केला आहे.

नगर तालुक्यातील कोळगेवाडी (अकोळनेर) येथे ही घटना घडली. बाबासाहेब रामभाऊ रोहकले असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट यांनी याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अभियंता बराट व वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल थोरवे, शरद काकडे, पंच समीर शेख, राजू गहिनीनाथ आदींचे पथक वीजचोरी पकडण्याच्या मोहिमेवर असताना अकोळनेर शिवारातील कोळगेवाडी येथे बाबासाहेब रोहकले यांच्या घरी गेले. त्यांना विजेच्या खांबावरून वीज मीटरपर्यंत आलेल्या केबलला मध्येच कट मारून त्यावर आकडा टाकून वीज चोरी होत असल्याचे दिसून आले. त्यांनी ही वीजचोरी पकडतानाचे व्हिडिओ चित्रीकरण केले.

रोहकले यांनी सुमारे दोन वर्षांपासून ही वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाल्यावर, त्यांना एकूण 1829 युनिट वीजचोरीचे 19 हजार 320 रुपये व तडजोडीची रक्कम 4 हजार असे एकूण 23 हजार 320 रुपयांचे बिल देऊन, त्याचा भरणा करण्यासाठी मुदत दिली. मात्र, मुदतीत त्यांनी बिल भरणा न केल्याने अभियंता बराट यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब रोहकले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button