श्रीरामपूर : कबड्डी स्पर्धेतून नव्या पिढीस मेजवानी : ना. विखे पा | पुढारी

श्रीरामपूर : कबड्डी स्पर्धेतून नव्या पिढीस मेजवानी : ना. विखे पा

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : कबड्डी मातीतला खेळ आहे. विविध खेळांमधून एकता व खिलाडूवृत्ती निर्माण होऊन त्याद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जि. प सदस्य शरद नवले यांच्या अधिपत्याखाली गावकरी मंडळाने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धा म्हणजे जणू नव्या पिढीस मेजवानीच आहे. कबड्डीचा खेळ युवकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केला.

बेलापूर ग्रामपंचायतीच्या शताब्दीपुर्तीनिमित्त गावकरी मंडळ आयोजित ना. राधाकृष्ण विखे पा.चषक खुल्या कबड्डी स्पर्धांचा दिमाखदार शुभारंभ ना. विखे पा. यांच्या हस्ते मराठी शाळेच्या मैदानावर करण्यात आला. यावेळी ना. विखे खेळाडूंना सदिच्छा देताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जालिंदर पा. कुर्‍हे होते. सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वागत केले. संयोजक शरद नवले यांनी प्रास्ताविक केले.

आम्हाला ना. विखे पा. यांचा नेहमीच अभिमान वाटतो. आम्ही आपल्या नावाला साजेसे काम करुन दाखवून. प्रवरेच्या प्रवाहात विलीन होऊ, अशी ग्वाही देत नवले यांनी ‘खेळ खेळायचा असतो’ ही स्वरचित कविता सादर करुन उपस्थितांची वाहऽऽवा मिळविली. ना. विखे पा. यांनी बेलापूरगावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

तत्पूर्वी शरद नवले यांच्या निधीतून 40 लाख रुपये खर्चाच्या गावातील उर्दु शाळेच्या चार खोल्यांचे भूमिपूजन तसेच 5 लाख रुपये खर्चाच्या शिल्पकार प्रशांत बंगाळ यांच्या कल्पकतेतून उभारलेल्या विजयस्तंभाचे अनावरण ना. विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. खेळाडूंची सर्वांची निवास व भोजन व्यवस्था संयोजकांनी केली आहे. स्पर्धेस आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अत्याधुनिक पद्धतीने मॅटवर या स्पर्धा घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.

ना. विखे यांचे जोरदार स्वागत
फटाक्यांची आतषबाजी करीत ना. विखे यांचे उत्साहात स्वागत व नंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या निवासस्थानी ना. विखे यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.

Back to top button