राहाता : सायकल आडवी घातल्याने वीस वर्षीय युवकाचा भोसकून खून | पुढारी

राहाता : सायकल आडवी घातल्याने वीस वर्षीय युवकाचा भोसकून खून

राहाता; पुढारी वृत्तसेवा : सायकल आडवी घातल्याच्या किरकोळ वादातून एका वीस वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना राहाता शहरातील 15 चारी भागात शनिवारी (दि.4) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रोहित ईश्वर वर्मा (वय 20) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहाता शहरातील 15 चारी परिसरात इलियास रशीद पठाण (वय 65) यांचे कुटुंब राहते. त्यांचा नातू रोहित ईश्वर वर्मा (वय 20) हा घरासमोरील पडवीत बसलेला होता. यावेळी घराजवळच राहणारे अरबाज शेख व त्याचा एक अनोळखी साथीदार हातामध्ये चाकू सारखे धारदार हत्यार व काठ्या घेऊन आले. लहान भावासमोर सायकल आडवी घातल्याच्या कारणावरून ते रोहित वर्मा यास मारहाण करू लागले.

यावेळी आजी व आजोबा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले असता आरोपी अरबाज शेख याने त्यांनाही मारहाण केली. ‘रोहित याचा आता मर्डरच करून टाकतो’, असे म्हणत आरोपी रोहित यास काठीने मारहाण करू लागले. तेव्हा रोहित हा तेथून पळ काढू लागला असता, घरापासून 60 ते 70 फूट अंतरावर आरोपींनी रोहित याच्या छातीवर चाकूने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

नागरिकांनी खबर देताच पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. रुग्णवाहिके मधून रोहित यास रुग्णालयात उपचारार्थ नेले असता तेथील डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले पोलिसांनी या खून प्रकरणी एका आरोपीस अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button