नगर : मजूर फेडरेशनसाठी 41 उमेदवार रिंगणात! सत्ताधारी गटाचे दोघे बिनविरोध | पुढारी

नगर : मजूर फेडरेशनसाठी 41 उमेदवार रिंगणात! सत्ताधारी गटाचे दोघे बिनविरोध

नगर; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी 70 कोटींपेक्षा अधिक उलाढाली असलेल्या जिल्हा मजूर फेडरेशनच्या अर्ज माघारीनंतर 20 जागांसाठी 41 इच्छुकांचे अर्ज शिल्लक राहिलेले आहेत. यात, काल शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडीनंतर सत्ताधारी बोरूडे गटाच्या सहकार विकास पॅनलने नगर आणि कर्जत तालुक्यातील सर्वसाधारणच्या दोन जागा बिनविरोध काढत विरोधकांना मतदानापूर्वीच चपराक दिल्याचे बोलले जाते. जिल्हा मजूर फेडरेशनच्या 20 जागांसाठी 94 इच्छुकांनी 144 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

31 जानेवारी ही अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. त्यामुळे काल मंगळवारी नगर तालुका सहायक निबंधक कार्यालय परिसरात मोठ्या घडामोडी सुरू होत्या. कोणाचा अर्ज काढायचा, कोणाचा ठेवायचा, यासाठी ‘साहेबां’च्या आदेशाकडे श्रेष्ठीसह इच्छुकांच्याही नजरा होत्या. त्यानुसार काहींना अनपेक्षिपणे माघार घ्यावी लागली, तर काहींना उमेदवारीची लॉटरी लागली.

यात कुठे आपल्याकडे सर्वाधिक संस्था असल्याचे कार्ड वापरले, तर काहींनी राजकीय शिफारसही पुढे केल्याचे ऐकायला मिळाले. या घडामोडीत 53 इच्छुकांनी काल आपले अर्ज माघारी घेतले. यात काहींना ‘शब्द’ही देण्यात आले. त्यामुळे 20 जागांसाठी 41 इच्छुक मैदानात राहिले.

यातही नगर तालुका सर्वसाधारण मतदार संघातून संस्थेचे माजी उपाध्यक्ष विकास जगताप आणि कर्जतमधून लिलावती युवराज लाळगे हे बिनविरोध निवडून आले आहेत. उवर्रीत 18 जागाही मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा विश्वास सत्ताधारी गटाचे नेते अर्जून बोरूडे यांनी व्यक्त केला आहे. बिनविरोध दोन जागा आल्यानंतर सत्ताधार्‍यांनी जल्लोष केला. 12 तारखेला 18 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उपनिबंधक गणेश पुरी यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रत्नाळे हे काम पाहत आहेत.

ढोकणे-तनपुरेंमध्ये कांटे की टक्कर!
गतपंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री विखे पाटील यांचे व्याही तथा तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे समर्थक समजले जाणारे बाळासाहेब तनपुरे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. त्यावेळी ढोकणेंकडून तनपुरेंचा अवघ्या थोड्या मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत पुन्हा ढोकणे-तनपुरे हे आमनेसामने आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची तितकीच चुरशीची होणार आहे.

Back to top button