करंजी : अनधिकृत नळजोडांवर कारवाई ! सत्ताधार्‍यांचे संकेत | पुढारी

करंजी : अनधिकृत नळजोडांवर कारवाई ! सत्ताधार्‍यांचे संकेत

करंजी; पुढारी वृत्तसेवा : तिसगाव ग्रामपंचायतीची पाणीपट्टी थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पूर्ण दाबाने व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत सत्ताधारी गटाने दिले. पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याची प्रत्येकाला सवय असावी, असा मार्मिक सल्लाही ग्रामसभेत देण्यात आला. तिसगावची ग्रामसभा सरपंच मुनिफा शेख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी बालविवाह कायद्याची अंमलबजावणी, जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामे आदी विषयांवर ग्रामसभेत चर्चा झाली.

यावेळी घरपट्टी, पाणीपट्टीची ग्रामस्थांकडून नियमाप्रमाणे वसुली व्हावी. ग्रामपंचायत कार्यालयात कोणाचीही कागदपत्रांवरून अडवणूक होऊ नये, अशी भूमिका माजी सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी मांडली. महामार्गावर भरणारा आठवडे बाजार व ग्रामस्थासह शेतकर्‍यांची डोकेदुखी ठरलेल्या मोकाट डुकरांच्या विषयावरही यावेळी चर्चा झाली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना चांगल्या कामाची अपेक्षा आहे. आम्ही अपेक्षित विकास व पारदर्शक कारभार करू. चांगल्या कामासाठी ग्रामस्थांची साथ महत्त्वाची ठरणार आहे, असे सरपंच शेख म्हणाल्या.

यावेळी चेअरमन बाळासाहेब लवांडे, इलियास शेख, उपसरपंच संगीता गारुडकर, सदस्य डॉ.काशीनाथ ससाणे, पंकज मगर, अमोल भुजबळ, प्रदीप वाघ, रमेश नरवडे, सचिन साळवे, फरहत शेख, बिस्मिल्ला पठाण, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष अरिफ तांबोळी, बाळासाहेब गारुडकर, डॉ.रवींद्र इंगळे, आनंद लवांडे, अण्णासाहेब लवांडे, शबाना शेख, सिकंदर पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक अधिकार्‍यांनी मारली दांडी
या ग्रामसभेला तिसगावचे पशुवैद्यकीय अधिकारी वगळता इतर विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने विचारणा केली जाणार असल्याचे सरपंच मुनिफा शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Back to top button