अकोले : वाळू वाहणार्‍या वाहन मालकांना दंडाच्या नोटिसा | पुढारी

अकोले : वाळू वाहणार्‍या वाहन मालकांना दंडाच्या नोटिसा

अकोले; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात महसूल पथकाला बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक व तीन ब्रासचे चलन आणि सहा ब्रास खडी वाहतूक करताना 5 वाहने आढळून आले होते. या संदर्भात त्या वाळू वाहणार्‍या वाहनांवर कारवाई कधी? असे वृत्त दैनिक ‘पुढारी’त प्रसिद्ध होताच महसूल विभागाने ‘त्या’ वाहनधारकांना दंडात्मक कारवाई बाबत नोटीस बजावली. तरीही खुलाशाच्या नावाखाली महसूलच्या ताब्यात असलेली काही वाहने कारवाई विना सोडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने महसूलने काय वसुल केले? अशी उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा बसण्याबरोबरच राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या सनियंत्रण व देखरेख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाखनिज संगणक प्रणाली लागू केली आहे. यामुळे अकोले तालुक्यातील मंडलधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी डोळयात तेल घालून अक्षरशः तारेवरची कसरत करत कमलेश ढेरे (रा. धांदरफळ यांच्या मालकीचा (एमएच 21 बी. एच. 3588) टेम्पो, पोपट कारभारी धुमाळ यांचा (एमएच ए. व्ही. 7476) ट्रॅक्टर, रूपाली रामभाऊ साळुंखे यांचा (एमएच 04 जे. यु. 3233) यांचे वाहन अवैध गौण खनिज वाहताना महसूल पथकाला आढळून आला होता.

तसेच कोल्हार – घोटी रस्त्याचे डांबरीकरणाच्या बारी येथे कामाचा परवाना असलेला फक्त तीन ब्रास खडी (एमएच 16 सी.सी 3135) या शेख यांच्या वाहनात सुमारे सहा ते सात ब्रासच्या खडी वाहताना अकोले परिसरात महसूलच्या पथकाला आढळून आले होते. हे गौण खनिज वाहन सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात वाहन चालक, व्यवस्थापक व काही नेते महसूल विभागाच्या अधिकार्‍यांवर दबाव आणताना दिसून आले.

शासन निर्णयातील तरतुदीनुसार गौण खनिज वाहताना संगणक प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे असतानाही गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करणारी वाहने महसूलच्या पथकाने पकडून अहवाल तहसीलदार सतीश थेटेंकडे सादर केला. पण या संदर्भात त्या वाळू वाहणार्‍या वाहनांवर कारवाई कधी? असे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध होताच महसूल विभागाने त्या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई बाबत महाराष्ट्र जमीन अधिनियमचे कलमा नुसार विनापरवाना गौण खनिज उत्खनन व वाहतूक केले म्हणून ‘त्या’ पाच वाहनधारकांना लेखी नोटीस देऊन खुलासाही मागविण्यात आल्याची माहिती तहसीलदार सतिश थेटे यांनी दिली.

तसेच तालुक्यात खडी व सँड क्रेशर मालक, खान पट्टा धारक आणि गव्हर्नमेन्ट कॉन्ट्रॅक्टर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता समवेत तहसील कार्यालयात बैठक घेऊन बांधकाम आवश्यक गौण खनिजाची वाहतूक करताना महा खनिज संगणक प्रणालीचा अवलंब करण्याची सुचना तहसीलदार थेटे यांनी केली आहे. तालुक्यात महसुल पथकाला बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारे 4 व तीन ब्रासचे चलन आणि सहा ब्रास खडी वाहतूक करताना एक वाहन आढळून आले होते.

या पार्श्वभुमीवर महसूलच्या ताब्यात असलेल्या गौण खनिज वाहणार्‍या वाहनधारकांना नोटीस देऊन खुलासा मागवून अर्थात कागदाला कागद लावत काही वाहने सोडून देण्यात आल्याचे वास्तव दिसून आल्याने महसूल विभागाने गौण खनिज वाहतूक करणारे वाहन पकडून कारवाईचा फार्स करत डोंगर पोखरून उंदिर काढल्याच्या म्हणीचा प्रत्यय अकोले करांना आला आहे. पण मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी लक्ष घातल्यास गौणखनिज घोटाळा नक्कीच बाहेर येईल, असे मत जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

जिल्हा गौण खनिज समितीकडून गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी गट मंजूर करून घेणे आवश्यक आहे. तसेच गौण खनिज वाहतूक करताना जीपीएस आवश्यक आहे. वाहनासोबत इटीपी (वाहन परवाना) असावा. तसेच गौणखनिज वाहतुकीबाबत खडी व सँड वाँश क्रशर मालक, खाणपट्टाधारक आणि गव्हर्नमेन्ट कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍या वाहनांवर कडक कारवाई करणार आहे.
                                                             – सतिश थेटे, तहसीलदार, अकोले.

Back to top button