नगर : 2564 शाळाखोल्या होणार जमिनदोस्त! आचारसंहिता संपताच मोहिमेला गती | पुढारी

नगर : 2564 शाळाखोल्या होणार जमिनदोस्त! आचारसंहिता संपताच मोहिमेला गती

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील धोकादायक असलेल्या 2564 वर्ग खोल्यांचे निर्लेखन होऊन त्या पाडण्याची मोहीम बांधकाम विभागाने हाती घेतली आहे. मात्र आचारसंहितेमुळे दोन फेब्रुवारीनंतरच या कामाला आणखी गती मिळणार असून त्या जमिनदोस्त होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून झेडपीच्या शाळा आणि धोकादायक बनलेल्या वर्ग खोल्या, चर्चेचा विषय बनला आहे. या संदर्भात अधिवेशनातही चर्चा झालेली आहे. त्यानुसार ज्या खोल्या धोकादायक बनल्या होत्या, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसविले जात नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी खोल्यांची दुरुस्ती व नवीन कामेही झालेली आहेत. मात्र तरीही आज किमान 880 वर्ग खोल्यांची खर्‍याअर्थाने गरज आहे.

जिल्हा नियोजनच्या निधीतून शाळा खोल्यांची कामे केली जाणार आहेत. यामध्ये 93 नवीन शाळा खोल्यांच्या बांधकामाच्या प्रशासकीय मान्यताही झालेल्या आहेत. त्यामुळे लवकरच ही कामे मार्गी लागणार असल्याचे प्रशासनाकडून समजते. एकीकडे संस्थानच्या 10 कोटींमधून आता सार्वजनिक बांधकाम विभाग नव्हे तर जिल्हा परिषदेतूनच शाळा खोल्यांची बांधकामे करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे समजले आहे. मात्र प्रत्यक्षात अजुनही पुढे कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संस्थानचा निधी झेडपीच्या तिजोरीत पडून आहे. या निधीचा विनियोग झाल्यास 80 पेक्षा अधिक वर्ग खोल्यांची कामे होऊ शकणार आहेत. आचारसंहिता संपताच याबाबत निर्णय अपेक्षित आहे.

चाळीसीनंतर निर्लेखन
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अहवालानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाहणीत बांधकामाला 40 वर्षे पूर्ण झालेल्या खोल्या धोकादायक निदर्शनास आल्या, त्या वर्गखोल्या निर्लेखनास पात्र ठरवून तो अहवाल झेडपीला सादर करण्यात आला. अशाप्रकारे 2564 वर्ग धोकादायक बनल्याचे पुढे आले.अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात निर्लेखनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी प्रशासनाला संबंधित शाळांची यादी दिली होती.

तालुका शाळा धोकादायक खोल्या

राहुरी 32 94
नगर 80 309
नेवासा 63 279
संगमनेर 45 199
अकोले 72 209
राहाता 28 139
श्रीरामपूर 10 57
श्रीगोंदा 74 282
कर्जत 35 86
जामखेड 69 179
पारनेर 60 171
कोपरगाव 43 148
शेवगाव 65 182
पाथर्डी 44 230
एकूण 720 2564

सध्या 880 वर्ग खोल्यांची आपल्या आवश्यकता आहे. असे असले तरी 2500 खोल्या वापरात नव्हत्या, मात्र त्या धोकादायक असल्याने त्याचे निर्लेखन करण्यात आलेले आहे. त्या लवकरच पाडल्या जाणार आहेत.

                                              – भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी

Back to top button