श्रीरामपूर : मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्काचे आरोपपत्र; डीवायएसपी मिटके यांची माहिती | पुढारी

श्रीरामपूर : मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्काचे आरोपपत्र; डीवायएसपी मिटके यांची माहिती

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर शहर पोलिसात विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या मुल्ला कटर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, मोक्का कायद्यान्वये कलमांमध्ये वाढ करून सखोल तपास करून अप्पर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मंजुरीनंतर विशेष मोक्का न्यायालयात या टोळीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती डिवायएसपी संदीप मिटके यांनी दिली.

मुल्ला कटर बळाचा वापर करून आर्थिक फायदा मिळविण्याकरिता साथीदारांसह शहर परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतो. टोळीप्रमुखासह सदस्यांविषयी शहर व परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामपूर परिसरातील पिडितेवर सामूहिक अत्याचार करून तिला पांढरी पुल येथे टोळीचा सदस्य बाबा चेंडवाल यास विक्री केल्याचा गंभीर गुन्हा मिटकेंसह पोलिसांनी उघड केला. बाबा चेंडवाल याने बळजबरीने अत्याचार करुन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.

टोळीचा प्रमुख मुल्ला कटर, बाबा चेंडवाल, पप्पू ऊर्फ प्रशांत दादासाहेब गोरे यांनी पीडितेस शेवगाव येथील मिना मुसवत हिला विक्री केली. या गुन्ह्यात सुमन मधुकर पगारे व सचिन मधुकर पगारे यांनी मदत केल्यासह अवैध व्यवसाय करून मिळणार्‍या पैशावर उदरनिर्वाह केल्याचे निष्पन्न झाले.

तपासी अधिकारी मिटके यांनी या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 चे कलम 3(1),(ळळ),3(2),3(4)प्रमाणे कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी मिटके, पी. आय. गवळी, ए.पी.आय. बोरसे, पी.एस.आय. सुरवडे, एल. पी. एन. अश्विनी पवार, पी.एन. संतोष दरेकर, पी. सी. रवींद्र माळी व विलास उकिरडे यांनी यशस्वी केली. या बहुचर्चित गुन्ह्याचा तपास यशस्वीरित्या होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मुल्ला कटरचे शहरात वास्तव्य..!
टोळीचा टोळीप्रमुख इम्रान युसुफ कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर (वय 35 वर्षे,
रा.वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर) हा आहे. त्याचे श्रीरामपुरात कायम वास्तव्य आहे. टोळीतील इतर सदस्यांसह त्याने वेळोवेळी एकत्र येत संघटितपणे मालमत्ता विषयक, शरीराविरुद्धचे, महिला अत्याचार संबंधी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

Back to top button