उत्तर नगरमध्ये धुकेच-धुके चोहिकडे! श्रीरामपूर, राहाता, संमनेरात वाहन चालकांचे हाल | पुढारी

उत्तर नगरमध्ये धुकेच-धुके चोहिकडे! श्रीरामपूर, राहाता, संमनेरात वाहन चालकांचे हाल

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : वातावरणात अचानक गारवा वाढला आहे. अशातच सोमवारी पहाटे उत्तर नगरमधील श्रीरामपूरसह, बेलापूर, राहाता, कोल्हार, संगमनेर आदी तालुक्यांसह गावोगाव सर्वत्र धुकेच- धुके चोहिकडे दिसले. धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सूर्यदर्शन न झाल्यामुळे सर्व भाग धुक्यात हरवल्याचे दिसले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरांसह परिसरात उपनगरांमध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे.

सोमवारी नागरिकांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावर णाचा सुखद अनुभव घेतला. सोमवारी पहाटेपासूनच सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे शहरात रस्तेसुद्धा दिसत नव्हते. वाहन चालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने पुणे -नाशिक- कोल्हार -घोटी या प्रमुख महामार्गांवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

15 ते 20 फुटांवरील घरे व वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांसमोर पर्याय नव्हता. उशिरापर्यंत दाट धुक्याचा अंमल असल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोटी पेटवल्याचे चित्र दिसत होते. वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

जॉगिंग पार्कमध्ये, मोकळ्या मैदानांवर फिरण्यास जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. दाट धुक्यामुळे वातावरण आल्हाददायक बनले होते. मात्र, धुक्याने जवळचे दिसत नसल्यामुळे फिरण्यास येणारे नागरिक मोबाइलच्या टॉर्चचा आधार घेताना दिसत होते. धुक्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

आकाशात दाटली ढगांची गर्दी
कोल्हार भगवतीपूर परिसरात आज पहाटेपासून दाट धुके पडले होते. पहाटे 4.30 वाजे दरम्यान पसरलेले हे धुके सकाळी 9.30 पर्यंत दिसत होते. नगर- मनमाड राज्य मार्ग धुक्यात हरवला होता. भल्या पहाटे चालक वाहनांचे लाईट लावून धुक्यातून संथ गतीने राज्य मार्गावरून मार्गक्रमण करीत होते. सकाळी 10 वाजेच्या सुमारास धुक्याचे वातावरण निवळून ऊन पडले तर दुपारी आकाशात ढगांनी गर्दी केली होती.

Back to top button