नगर : बैलगाडा शर्यतींवर धनिकांची ‘कमांड’ | पुढारी

नगर : बैलगाडा शर्यतींवर धनिकांची ‘कमांड’

जवळा : पुढारी वृत्तसेवा : बैलगाडा शर्यती हा तसा जुना 70 ते 80 वर्षांपेक्षाही अगोदरपासूनचा हाडाच्या शेतकर्‍यांचा आवडीचा व जिव्हाळ्याचा खेळ. परंतु, अलीकडच्या काळात धनिकांनी या खेळावर पैशाच्या जोरावर आपली कमांड बसविली असल्याचे चित्र पाहायला मिळते. पूर्वी शेतकरी शर्यतीत आपल्या बैलांना सहभागी करून घेत असत. तेच बैल शर्यती संपल्यानंतर पुन्हा त्यांचा शेतीसाठी वापर करत असत. आपली शेती करून घेत असत. आसपासच्या गावांच्या यात्रा आल्या की पंधरा ते वीस दिवस त्यांचा खुराक जरा जास्त वाढवून बैलगाड्यांचा सराव करून घेतला जात असे. मग त्या बैलगाडा शर्यतीमध्ये आपला नंबर येऊ अथवा न येऊ आपले बैल घाटात धावले. याचाच त्यांना आनंद लाखमोलाचा होत असे.

त्यावेळी तो फक्त हौस, नवसाचा खेळ म्हणून त्याकडे शेतकरी पाहत असत. त्यावेळी गावातील बैलगाडा म्हटल्यावर गावातील लोक शेजारीपाजारी बैलगाडा जुंपण्यास धरण्यास मदतीला येत असत. तेही अगदी स्वेच्छेने. आता अलीकडच्या काळाच्या बैलगाडा शर्यतीत काळानुसार आमूलाग्र बदल होत गेले. शेतीत यांत्रिकीकरण झाले. परिणामी शेतीसाठी लागणार्‍या बैलांची संख्या कमी झाली. गावरान गायी पाळण्याचे प्रमाणही कमी झाले. हौसा नवसाचे बैलगाडी मालक कमी होत जाऊन बैलगाडा शर्यत हा एक प्रतिष्ठेचा खेळ बनला. त्यामुळे आता उद्योगपती, राजकारणी, व्यावसायिक व धनिकांची बैलगाडा शर्यतीवर कमांड असल्याचे चित्र दिसू लागले आहे. फक्त बैलगाड्यासाठीच व घाटात आपल्या नावाचा डंका परिसरातील गावात व्हावा, याचा आटपिटा करून लाखो रुपयांचा चुराडा धनिक मंडळी करताना दिसत आहेत.

सर्व काही नावलौकिकासाठी
नावलौकीकासाठी बैलगाडा शर्यती भरविल्या जात आहेत. सुमारे 15 ते 20 लाख रुपयापर्यंत बैल शर्यतीसाठी विकत घेतले जात आहेत. त्यामुळे लाखो रुपयाची बैल बाजारात आता चांगलीच तेजी आली आहे. बैलगाडा शर्यतींचा सध्या मोठा गाजावाजा होताना दिसत आहे. परंतु खरा हाडाचा शेतकरी मात्र बैलगाडा शर्यतीपासून दुरावत चालला असल्याचे वास्तव आहे.

Back to top button