नगर : अवैध गौण खनिजासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नगर : अवैध गौण खनिजासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ताहाराबाद येथे पोलिस पथकाने (दि.22) जानेवारी रोजी अवैध खडी वाहत असलेल्या ढंपरवर कारवाई केली. 10 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (दि.22) जानेवारी रोजी दुपारी 4 वाजे दरम्यान पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या आदेशानुसार पो. ह. जानकीराम खेमनर, पो. ना. अविनाश सिताराम दुधाडे, रामनाथ सानप यांनी राहुरी तालुक्यातील ताहाराबाद रोडवर गडधे आखाडा परिसरात ढंपर (क्र. एम एच 16 सी सी 1774) याच्यामध्ये शासनाच्या मालकीची खडी चोरून नेताना कारवाई केली.

पोलिस पथकाने ढंपर चालकाकडे खडी वाहतूकीचा परवानाबाबत विचारणा केली असता, कोणताही परवाना नसल्याचे दिसले. पोलिस पथकाने 10 लाख रूपयांचा ढंपर व 15 हजार रुपए किमतीची 3 ब्रास खडी असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पो. ना. अविनाश दुधाडे यांच्या फिर्यादीवरून ढंपर चालक सचिन कोळेकर ( रा. राहुरी बुद्रुक, ता. राहुरी) याच्याविरोधात गुन्हा रजि नं. 84/2023 भादंवि कलम 379 पर्यावरण संरक्षण अधिनियम 15, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button