नगर : थकबाकीदारांना बसणार महावितरणचा शॉक ! पाच हजार शेतकर्‍यांकडे 191 कोटी | पुढारी

नगर : थकबाकीदारांना बसणार महावितरणचा शॉक ! पाच हजार शेतकर्‍यांकडे 191 कोटी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  थकीत देयकाची रक्कम भरण्यासाठी, तसेच त्यासाठी विविध योजना आखूनही महावितरणच्या आवाहनास कृषी ग्राहकांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पाच वर्षांहून अधिक काळापासून देयक थकविणार्‍या 7.5 अश्वशक्ती पेक्षा अधिक मंजूर जोडभार असणार्‍या कृषी ग्राहकांच्या शेती पंपाचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 5 हजार 156 शेतकर्‍यांनी 191 कोटी 92 लाख रुपये थकविले आहेत. महावितरणकडून आवाहन करूनही प्रतीसाद न मिळाल्याने या शेतकर्‍यांच्या विरोधात महावितरण प्रशासनास नाईलाजाने कारवाई करावी लागणार आहे.

जिल्ह्यात 5 ते 10 वर्षांत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या 2 हजार 959 असून, या ग्राहकांकडे 102 कोटी 35 लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे – 7.5 ते 10 अश्वशक्ती असणारे 2 हजार 185 ग्राहक, 10 ते 20 अश्वशक्ती असणारे 686 आणि 20 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍यांची संख्या 88 आहे.

तर, 10 ते 15 वर्षांत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या 1 हजार 594 असून, या ग्राहकांकडे 63 कोटी 19 लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे – 7.5 ते 10 अश्वशक्ती असणारे 1 हजार 244 ग्राहक, 10 ते 20 अश्वशक्ती असणारे 327 आणि 20 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍यांची संख्या 23 आहे.

तर, 15 वर्षार्पंक्षा जास्त कालावधीत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या 603 असून, या ग्राहकांकडे 26 कोटी 36 लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे – 7.5 ते 10 अश्वशक्ती असणारे 482 ग्राहक, 10 ते 20 अश्वशक्ती असणारे 110 आणि 20 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍यांची संख्या 11 आहे.

थकबाकी न भरण्याकडे कल
जिल्ह्यात 5 ते 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या 5 हजार 156 आहे. त्यांच्याकडे 191 कोटी 92 लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे – 7.5 ते 10 अश्वशक्ती – 3 हजार 911, 10 ते 20 अश्वशक्ती – 1 हजार 123 आणि 20 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍यांची संख्या 122 आहे.

Back to top button