कोपरगाव : कोल्हे कारखान्याची सेंद्रीय खत निर्मिती; विवेक कोल्हेंची माहिती | पुढारी

कोपरगाव : कोल्हे कारखान्याची सेंद्रीय खत निर्मिती; विवेक कोल्हेंची माहिती

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांच्या उत्पादन वाढीसाठी सवतोपरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली आहे. ऊस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी कारखान्याने स्वत: सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. खताच्या पॅकिंग मशीनचा शुभारंभ गणेश जयंतीच्या मुहूर्तावर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले. बिपीनराव कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. शेतकरी सभासदांनी दर्जेदार ऊस बेणे निवडून प्रती एकरी ऊस उत्पादनात वाढ करावी, त्याकरीता संजीवनी सेंद्रीय खताचा वापर करावा. कंपोष्ट पासून बनविण्यात येत असलेल्या सेंद्रीय खताचे उत्पादन सुरू करण्यात येत असलेल्या मशिनचा वापर दिवसातील तीनही शिफ्ट करून जास्तीत जास्त सेंद्रीय खत तयार करावे. तयार झालेले सेंद्रीय खत ऊस पिकाबरोबरच इतरही पिकांना मागणीनुसार देण्यात यावे.

उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याच्या उपक्रमांची माहिती दिली. ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी सेंद्रीय खत निर्मिती उत्पादनाची माहिती दिली. संचालक बापूसाहेब बारहाते व संगीता बारहाते यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, मनेष गाडे, सतिष आव्हाड, बाळासाहेब पानगव्हाणे, विलास माळी, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.

कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी सवलतीच्या दरात सेंद्रीय खत पुरविण्यात येईल. सदरच्या सेंद्रीय खताचा दर्जा, गुणवत्ता टिकविल्यामुळे सभासद शेतकर्‍यांच्या अधिक पसंतीस संजीवनी सेंद्रीय खत उतरले आहे.

                                                       बिपीनराव कोल्हे
                                      अध्यक्ष, संजीवनी उद्योग

Back to top button