श्रीगोंदा : पोलिस ठाण्याच्या आवारात हाणामारी; दोन तरुणांना जबर मारहाण | पुढारी

श्रीगोंदा : पोलिस ठाण्याच्या आवारात हाणामारी; दोन तरुणांना जबर मारहाण

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : दुचाकीला कट मारल्याच्या कारणातून पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवारी (दि.24) दुपारी दोन तरुणांना जबर मारहाण करण्यात आली. शेकडो लोकांच्या गर्दीत ही मारहाण सुरू असताना, श्रीगोंदा पोलिसांनी काहीकाळ बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. सकाळी शहरातील दोन तरुणांमध्ये दुचाकीला कट मारण्याच्या कारणातून वाद झाला. या वादातून एका तरूणाला मारहाण झाली. त्यानंतर मारहाण झालेल्या तरूणाच्या गटाने दुसर्‍या तरुणाला बसस्थानक परिसरात जाऊन जबर मारहाण केली. त्यानंतर दोन्ही गटाचे नेते, काही नगरसेवक व तरुण असा मोठा जमाव पोलिस ठाण्यासमोर जमा झाला.

त्याठिकाणी दोन्ही बाजूने या वादावर पडदा टाकण्याचे ठरले. वाद मिटवण्याचे ठरलेले असतानाच पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या दुसर्‍या गटाच्या काही तरूणांनी बाहेर आलेल्या दोघा तरुणांवर अचानक हल्ला चढविला. हल्ला झाल्यामुळे हे तरूण जवळ असलेल्या एका सेतू कार्यालयात घुसले. दुसर्‍या गटाच्या तरुणांनी तेथे घुसून या दोघांना जबर मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अद्याप दोन्ही गटाकडून कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही

नागरिकांत घबराट
भरदुपारी पोलिस ठाणे परिसरात गर्दीच्या ठिकाणी तरूणांवर झालेल्या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला. कामानिमित्त आलेल्या लोकांची चांगलीच धांदल उडाली. या हल्ल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. पोलिस ठाण्यासमोरच असा हल्ला होऊनही पोलिसांनी काहीच हालचाल न केल्याची बाब चिंताजनक आहे. मारहाणीच्या घटनेमुळे शहरात पोलिसांचा वचक राहिला नसल्याचा सूर जनतेतून उमटत आहे.

गर्दी पांगविण्याचीही तसदी नाही
वाद झाल्यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही गटांचे तरुण मोठ्या संख्येने पोलिस ठाणे परिसरात जमा झाले होते. मोठी गर्दी झालेली असतानाही पोलिसांनी हा जमाव पांगविण्याची साधी तसदी घेतली नाही. प्रसंगावधान राखत पोलिसांनी वेळीच गर्दी पांगविली असती तर, त्या ठिकाणी वाद टळला असता, अशी परिसरात चर्चा होती.

आधी बघ्याची भूमिका, मग लाठीचार्ज
पोलिस ठाण्याबाहेर तरुणांना मारहाण सुरू असताना मोठा गोंधळ उडाला. तेव्हा पोलिसांनी आधी बघ्याची भूमिका घेतली. परंतु, वाद मिटविण्यासाठी आलेल्या नेत्यांनी पोलिसांना मारहाण सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास सांगितले. तेव्हा पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन लाठीचार्ज करत जमाव पांगविला.

Back to top button