नगर: अकोल्यात गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक वाढली, महसूल विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

नगर: अकोल्यात गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक वाढली, महसूल विभागाचे दुर्लक्ष

अकोले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा बसण्यासाठी महसूल विभागाने धडक कारवाईची मोहिम उघडली आहे. क्रशसँड, मुरुम, दगड(कच) असलेल्या डंपर, ट्रॅक्टर आणि टेम्पो ही वाहने अवैध गौण खनिज घेऊन जात असताना ताब्यात घेण्यात आली आहेत. परंतु या कारवाईवरून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्यानियमावलीला अकोल्यात केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्याच्या महसूलात वाढ करण्यासाठी गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी शासनाने महाखनिज ही संगणक प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीद्वारे गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी गौण खनिजाच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला असुन जीपीएसव्दारे रिअल टाईम मॉनिटेरिंग करण्यात येत आहे. दगड, वाळू, माती आदींसह उत्खनन करण्यासाठी पर्यावरण समितीचा परवाना अनिवार्य आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकास विना जीपीएसचे वाहन धावताना आढळून आल्यास उत्खनन व वाहतूक अवैध समजून सदर व्यक्तीविरोधात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) व ४८ (८) तसेच महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ व शासनाने दंडाबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. या पार्शभुमीवर अकोले तालुक्यात तहसीलदार सतिश थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार, मंडलधिकारी, तलाठी यांचे पथक गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेते.

महसूल विभागाच्या वतीने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार गौण खनिजाचे वाहताना संगणक प्रणालीचा अवलंब करुन नियमावलीनसार वाहतूक करणे गरजेचे आहे. परंतु अवैध वाहतूक काही थांबण्याचे नाव घेत नाही. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणारी वाहने अकोले तहसील विभागाचे प्रतिक खानेकर, खेमनर, तलाठी प्रविण ढोले, क़ोतवाल वडजे यांनी ताब्यात घेऊन अहवाल तहसीलदार सतीश थेटे कडे सादर केला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर काय दडात्मक कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण अकोले तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button