नगर :  सराईत गुंड धोत्रेला बेड्या ; मोक्का, खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात होता फरार | पुढारी

नगर :  सराईत गुंड धोत्रेला बेड्या ; मोक्का, खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात होता फरार

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  मोक्का व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला एलसीबीच्या पथकाने जेरबंद केले आहे. एमआयडीसी परिसरातील गांधीनगरात सापळा लावून आरोपीला पोलिसांनी अटक केली.  संतोष राघुनाथ धोत्रे (रा.नागापूर, एमाआयडीसी, अ.नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्ताफ अल्हाउदीन बागवान (रा. गजानन कॉलनी, नवनागापुर) यांना नवनागापुरातील सेंट मेरी चर्च येथे 17 मार्च 2022 रोजी बोलावून त्यांच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या व चाकूने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

याबाबत आरोपी अभिषेक भिंगारदिवे, गणेश काळे, प्रेम नरेंद्र भाकरे, किरण पालवे, नावीन्या भाकरे, दिपक बेरड, आशिष भाकरे (सर्व रा. नवनागापूर) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी संतोष धोत्रे हा फरार होता.
गांधीनगर परिसरात धोत्रे हा आरोपी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कटके यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावून आरोपीला अटक केली. संतोष धोत्रे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नगर व ठाणे जिल्ह्यात मोक्का, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, पोक्सो, गंभीर दुखापत, आर्म अ‍ॅक्ट असे गंभीर स्वरुपाचे 15 गुन्हे दाखल आहेत.

Back to top button