नगर : भंगार खरेदी दुकानदारांमध्ये खळबळ ; एकाच वेळी अनेक ठिकाणांवर छापेमारी | पुढारी

नगर : भंगार खरेदी दुकानदारांमध्ये खळबळ ; एकाच वेळी अनेक ठिकाणांवर छापेमारी

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  पोलिस ठाणे हद्दीतील चोर्‍यांवर अंकूश प्राप्त करण्यासाठी पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस यंत्रणा तैनात झाल्याचे दिसत आहे. ग्रामिण भागातून विद्युत पंप, केबल साहित्य चोरीला जाण्याच्या घटना पाहता पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने एकाचवेळी देवळाली प्रवरा ते नेवासा हद्दीपर्यंत असलेल्या सहा ते सात भंगार खरेदी करणार्‍या दुकानांवर एकाच वेळी धाड टाकण्यात आली. सबळ पुराव्याशिवाय भंगार खरेदी करू नये, अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या.
राहुरी तालुका परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

एकीकडे शेती पीकांचा कमी झालेला तर दर तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी शेती क्षेत्रातून विद्युत पंप व केबल चोरीला जाण्याचे वाढलेले प्रमाण पाहता शेतकरी हतबल झाला आहे. तसेच दुचाकी व घरासमोरील लोखंडी सामान चोरीला जाण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डांगे यांनी राहुरीचा चार्ज हाती घेताच गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी विविध मोहिम हाती घेत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, चोरी गेलेल्या मोटारी, केबल व इतर साहित्य भंगार दुकानांमध्ये विक्री केली जात असल्याची चर्चा राहुरी हद्दीत होत आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक डांगे यांनी पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, चारूदत्त खोंडे यांसह पोलिस हवालदार प्रभाकर शिरसाठ, अशोक शिंदे, सुचिन ताजणे, नदीम शेख, अजिनाथ पाखरे, प्रमोद ढोकणे, वाघमारे यांच्या वेगवेगळ्या पथकाने बुधवारी दुपारच्या सत्रात एकाचवेळी देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, राहुरी शहर, वांबोरी, सोनई हद्दीतील सहा ते सात दुकानांमध्ये अचानकपणे छापा टाकला. दुकानामध्ये संशयित असणार्‍या भंगाराची चौकशी करण्यात आली.

गुन्हेगारी कमी करणारच : पो. निरीक्षक डांगे

राहुरी हद्दीत गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. विविध उपाययोजना हाती घेऊन गुन्हेगारांवर अंकूश मिळविणार आहे. पोलिस पथके तैनात करण्यात आले असून छापेमारी सुरूच राहणार आहे. भंगार दुकानदारांनी कागदोपत्रांचे पुरावे असल्याशिवाय कोणतेही भंगार खरेदी करू नये. तसे न झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी दिला.

Back to top button