नगर : डीवायएसपी सातव यांची साकूरमध्ये ताफ्यासह एन्ट्री | पुढारी

नगर : डीवायएसपी सातव यांची साकूरमध्ये ताफ्यासह एन्ट्री

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकुरचे सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांच्यावर कट रचत प्राणघातक हत्यारांचा वापर करून जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आहे. या गुन्ह्यात तपासाअंती अ‍ॅट्रोसिटीचे वाढीव कलम लागल्याने आरोपींची संख्या वाढली आहे. पो. नि.सुनील पाटील यांच्याकडील तपास शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव यांच्याकडे वर्ग होताच त्यांनी साकुर गावात आज (दि. 3) जानेवारी रोजी एन्ट्री मारली. या गुन्ह्याच्या तपासाला गती देत आरोपींची चौकशी सुरू केली, परंतु आरोपी पसार झाल्याने सातव यांनी साकुर ग्रामस्थांशी चर्चा केली.

साकुर येथे 30 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत कार्यकर्ते सुनील इघे यांनी जोगेपठार आदिवासी लोकवस्तीचा पाणी पुरवठा जाणीवपूर्वक बंद करुन, अन्याय केल्याची भावना व्यक्त करीत आक्रमक प्रश्न उपस्थित केले होते. ग्रामसभेत इघे यांना मारहाण,धक्काबुक्की झाली.हे प्रकरण थेट घारगाव पोलिस स्टेशनला पोहचून 8 जणांवर गुन्हा दाखल झाला. येथूनच इघे यांना संपविण्याचा कट शिजला. घरी परतताना प्राणघातक भ्याड हल्ला झाला होता. एका साथीदाराच्या मदतीने व घारगाव पोलिसांच्या दक्षतेने इघे यांचे प्राण वाचले.3 जणांवर प्राणघातक हल्ल्यासह खुनाचा प्रयत्न व अ‍ॅट्रोसिटी सारख्या गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. इघे यांच्यासोबत असलेले प्रभाकर सुखदेव कदम यांचे फिर्यादीनुसार अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला.

पो.नि.सुनील पाटील यांची कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप इघे यांनी करताच तपास डीवायएसपी संजय सातव यांच्याकडे वर्ग झाल्याने ते साकुरला आले होते. दरम्यान, आज डीवायएसपी सातव यांनी साकुर गावात एन्ट्री मारीत ग्रामसचिवालयात ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी या गुन्ह्यात खोटे गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. यावर काही पुरावे असल्यास सादर करावे. त्यानुसार योग्य तपास केला जाईल. गुन्ह्यातील आरोपी स्वतःहून हजर झाले तर तपासाला सोपे होईल. या गुन्ह्याचा तपास पारदर्शक केला जाईल. योग्य तपास करीत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी चर्चा सातव व साकुर ग्रामस्थांमध्ये झाली.

आरोपी कधी अटक होणार?

या गुन्ह्यातील 3 आरोपी अटक आहेत. 4 जानेवारीपर्यंत ते पोलिस कोठडीत आहेत. उर्वरित आरोपी कधी अटक होणार,असा प्रश्न इघे समर्थकांनी केला आहे.

Back to top button