कोणी धर्मवीर म्हणा, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा : शरद पवार  | पुढारी

कोणी धर्मवीर म्हणा, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा : शरद पवार 

बारामती, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करीत ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. यावर ‘कोणी धर्मवीर म्हणा अथवा स्वराज्यरक्षक म्हणा’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

खा. शरद पवार म्हणाले की, अजित पवारांचे संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिले; पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेले लिखाण कोणालाही पसंत पडणारे नाही. ते कधीकाळी लिहिलेले होते, ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात काही उपयोग नाही. मात्र, संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगे नसल्याचे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्वराज्यरक्षक की धर्मवीर, याबाबत पवार म्हणाले की, ज्या नागरिकांना, व्यक्तींना, घटकांना छत्रपती संभाजी महाराजांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल, तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा. त्याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही.

राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल कोणतीही चर्चा नाही

बिगर काँग्रेस पक्षांमध्ये राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल कोणतीही चर्चा नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय पातळीवर आम्ही भाजपेतर पक्षाचे नेते एकत्र चर्चा करतो. मात्र, माझ्या कानावर अशी कोणतीही चर्चा आलेली नाही. बर्‍याचदा अशी चर्चा जेव्हा होते त्या संबंधीची बैठक माझ्या घरी असते. त्यामुळे माझ्या घरी झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली हे बहुतेकदा मला माहीत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Back to top button