कर्जत : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी कर्जत उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे निलंबन करण्यात आले तालुक्यातील जनतेच्या वतीने झालेल्या कारवाईचा निषेध करीत काल मोर्चा काढला. या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गौण खनिजप्रकरणी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी कर्तव्यात कुचराई केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करून प्रांताधिकारी थोरबोले व तहसीलदार आगळे यांचे निलंबन सरकारकडून करून घेतले. परंतु तालुक्यात कोरोनापासून उत्तम कामगिरी केलेल्या अधिकार्यांवर कारवाई झाल्याने सर्वच स्तरातून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, काल गुरुवारी सकाळी कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून घोषणाबाजी करीत भव्य मोर्चा काढण्यात आला .हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेत आंदोलन करण्यात आले. तेथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. तालुक्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी याच अधिकार्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. विक्रमी लाभार्थ्यांना त्याचा फायदा या माध्यमातून झाला.चांगलं काम केले असतानाही केवळ राजकीय द्वेषाापोटी अधिकार्यांवर कारवाई झाली, असे यावेळी नागरिकांनी बोलून दाखवले. तसेच महिलांनी कारवाईविरोधात जोरदार घोषणबाजी केली. या नंतर नागरिकांनी नायब तहसीलदार यांना निवेदन दिले. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी देखील सहभागी झाले होते
उपाशी राहून आंदोलनाचा वृद्ध महिलांचा इशारा
यावेळी पत्रकारांशी बोलताना काही वृद्ध महिलांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. असे चांगले अधिकारी असतानाही त्यांच्यावर कारवाई केली आहे, ती रद्द करावी, अशी मागणी करताना आम्ही उपाशी राहून आंदोलन करू, असा इशारा या त्यांनी दिला.