जामखेड : गावांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार राम शिंदे | पुढारी

जामखेड : गावांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार राम शिंदे

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : आपल्या गावचा कारभार करत असताना वीज, रस्ते, पाणी, सार्वजनिक, वैयक्तिक प्रश्न आपल्या माध्यमांतून सुटणार आहेत. जनतेने घवघवीत यश आपल्या पदरात टाकले आहे. भाजपवर जनतेने जो विश्वास दाखवला आहे. त्याला तडा जाणार नाही असे काम आपण सर्वजण मिळून करून दाखवू. कोणालाही निधी दिली.  कर्जत-जामखेड मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या 11 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल आमदार शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित 10 सरपंच आणि 86 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार चोंडी येथे करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. यावेळी रवी सुरवसे, काकासाहेब धांडे, अशोक खेडकर, सोमनाथ पाचारणे, अजय काशीद, डॉ.सुनील गावडे, बळीराम यादव, बाजार समिती सभापती गौतम उतेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले आदींसह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात आपलं सरकार नव्हतं आणि मीही आमदार नव्हतो. तेव्हा कुळधरण, कोरेगाव आणि बजरंगवाडी ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता मिळविली होती. आता सत्ता आलीय, मीही आमदार झालोय. 11 ग्रामपंचायतींपैकी 8 ठिकाणी भाजपने मित्रपक्ष आणि सहयोगी मित्रपक्ष यांच्या माध्यमांतून सत्ता मिळविली आहे. राहिलेल्या 3 पैकी राजुरी आणि निंबे या ग्रामपंचायतीत आपल्याला बहुमत आहे. आता गावाची प्रामाणिकपणे सेवा करत रहा. तुम्हाला निधीची कमतरता भासून देणार नाही. कर्जत-जामखेडमधील मतदारांबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

विकासाचं राजकारणच करणार

गेल्या अडीच तीन वर्षांत जो प्रशासनाचा, राजकारणाचा, कामाचा वैयक्तिकरित्या जो त्रास झाला, तो इथून पुढच्या काळात होणार नाही. राजकारण हे विकासाचं करू, एकमेकांना सहकार्य करू, हीच यापुढील काळात आपली भूमिका राहणार आहे, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Back to top button