नगर तालुका : निवडणूक ग्रामपंचायतींची चर्चा मात्र झेडपी- बाजार समितीची: माजी मंत्री कर्डिलेच ‘किंगमेकर

नगर तालुका : निवडणूक ग्रामपंचायतींची चर्चा मात्र झेडपी- बाजार समितीची: माजी मंत्री कर्डिलेच ‘किंगमेकर
Published on
Updated on

शशिकांत पवार

नगर तालुका : नगर तालुक्यातील 27 गावच्या निवडणूका पार पडल्या अन् निकालानंतर चर्चा सुरू झाली, ती आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती अन् कृषी उत्पन्न बाजार समितीची! अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यात पहावयास मिळली. निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यात माजी मंत्री शिवाजी कर्डिले हेच 'किंगमेकर' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपकडे 27पैकी तब्बल 22 ग्रामपंचायती आल्याचा दावा भाजप समर्थकांकडून करण्यात आला आहे.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले विरोधात महाविकास आघाडी हा पॅटर्न नगरमध्ये सर्वच निवडणुकांमध्ये राबविण्यात येत आहे. हाच 'फॉर्म्युला' राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी राबविण्यात आला होता. कर्डिलेंच्या विरोधात तालुक्यात आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, तसेच शिवसेना, काँग्रेस सर्व पक्षीय नेत्यांनी आघाडी केली होती. परंतु, निकालानंतर नगर तालुक्यात शिवाजी कर्डिले यांचाच बोलबाला असल्याचे दिसून आले.

तालुक्यातील 27 पैकी तब्बल 22 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्डिले यांनी तालुक्याचे आमदार म्हणून अनेक वर्ष नेतृत्त्व केले आहे. त्यामुळे त्यांची तालुक्यावर मजबूत पकड आहे. तालुका तीन मतदार संघात विखुरला गेला. पारनेर, श्रीगोंदा, राहुरी मतदार संघात तालुक्यातील गावांचा समावेश झाला; परंतु नगर तालुक्यातील गावांवर आजही माजी मंत्री कर्डिलेंची मजबूत पकड असल्याचे पार पडलेल्या निवडणूकांमधून दिसून आले.

तालुक्यात निवडणूक ग्रामपंचायतच्या पार पडल्या; परंतु चर्चा मात्र आगामी जिल्हा परिषद, बाजार समितीची सुरू झाली आहे. प्रत्येक गटातून जिल्हा परिषद, तसेच गणातून पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या गणितांची जुळवा-जुळवा सुरू केली आहे. तसेच, ग्रामपंचायत सदस्य बाजार समितीसाठी मतदार असल्याने बाजार समितीसाठी इच्छुकांनीही गोळाबेरीज सुरू केली आहे.

नगर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात कर्डिले यांना मानणारा मोठा वर्ग दिसून येतो. ग्रामपंचायत निवडणुकीत गाव पातळीवरील संबंध पाहून मतदान होत असते. तर, जिल्हा परिषदेसाठी, विधानसभेसाठी, तसेच लोकसभेसाठी मतदारांची वेगवेगळी भूमिका राहत असल्याचे यापूर्वीचे निवडणूकांवरून दिसून आले आहे. त्यामुळे या निवडणूकांवरून पुढील निवडणूकांचा अंदाज वर्तविणे चुकीचे ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

'पुढारी' माहिती देताना कर्डिले म्हणाले, अडीच वर्षे महाविकास आघाडीचे निष्क्रिय सरकार जनतेने पाहिले. 2014 ते 2019च्या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकास कामे राज्याने पाहिली आहेत. आश्वासनांची खैरात अन् घोषणा या पलीकडे महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही. आपली निष्क्रियता झाकण्यासाठी कोणत्याही विषयाचे भांडवल करण्याचे त्यांचे उद्योग आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ही फक्त नांदी आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्त्वाखाली लढल्या गेलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. खरे गुन्हेगार कोण हे राहुरीकरांनी पिढ्यान पिढ्या अनुभवले आहे. प्रॉपर्टीसाठी निष्पापाचा बळी घेणारे कोण हे राहुरीकरांना तसेच सर्व जनतेला माहिती असल्याची टीकाही कर्डिले यांनी केली.

ग्रामपंचायतमध्ये मतदारांनी फक्त चुनुक दाखवली आहे. ही सुरुवात असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच बाजार समितीमध्ये भाजपचा झेंडा फडकणार आहे.
विरोधकांच्या निष्क्रियतेची जाणीव सर्वसामान्य जनतेला झाली आहे. मतदारांनी मतदानातून आपला रोष व्यक्त करत भाजपला भरभरून मतदान केले.

                                                      -शिवाजी कर्डिले, माजी मंत्री

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी तालुक्यात केलेली विकास कामे, तसेच दांडगा जनसंपर्क यामुळे जनतेचा कर्डिले यांच्यावर विश्वास आहे. कर्डिले यांच्या मार्फत तालुक्यातील अनेक योजना, कामे मार्गी लागत आहेत. खासदार विखे व शिवाजी कर्डिले यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला. यापुढील निवडणुकांमध्ये देखील हेच चित्र पहावयास मिळणार आहे.
                                                  – बंडू पवार, माजी उपसरपंच, जेऊर

नगर तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली आहेत. कापूरवाडी गावातही ते आमदार असताना विकास कामांची गंगा वाहत होती. खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावात विविध विकास योजना राबविण्यात येणार आहेत.

                                                      – जनाबाई दुसंगे, सरपंच, कापूरवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news