राहुरीत 79 टक्के मतदारांनी केले मतदान | पुढारी

राहुरीत 79 टक्के मतदारांनी केले मतदान

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहामध्ये आपले मत इव्हीएम मशिनमध्ये नोंदणी केली आहे. सरासरी 79 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 28 हजार 380 मतदारांपैकी 22 हजार 378 मतदारांनी आपले मतदान दिले असून दि. 20 रोजी मतमोजणीनंतरच कोण गुलाल उधळणार? हे स्पष्ट होणार आहे.
राहुरी तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या आरडगाव, मानोरी, कोंढवड, कोल्हार खुर्द, मांजरी, तुळापूर, केंद्रळ खुर्द, खडांबे खुर्द, ब्राम्हणगाव भांड, सोनगाव व ताहाराबाद या गावांमध्ये सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्राकडे रांगा लावल्या होत्या.

तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाच्या आवाहनला प्रतिसाद देत मतदार व उमेदवारांनी कोठेही अनूचित प्रकार घडू न देता शांततेने मतदान घडवून आणले. आरडगाव ग्रामपंचायतीमध्ये 3 हजार मतदारांपैकी 2 हजार 817 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तेथे 81. 79 इतके मतदान घडवून आणल्यानंतर निकालाबाबत उत्सुगता लागलेली आहे. यासह केंदळ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये 1 हजार 568 मतदारांपैकी 1 हजार 210 मतदारांनी आपले मतदान दिले आहे. लक्षवेधी ठरत असलेल्या सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये 3 हजार 274 मतदारांपैकी 2 हजार 382 इतके म्हणजेच 72.76 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. संत महिपती महाराज यांची पावनभुमी समजल्या जाणार्‍या ताहाराबाद ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निवडण्यासाठी 2 हजार 660 मतदारांपैकी 1 हजार 583 मतदारांनी आपला हक्क बजावला. तेथे 59.51 इतकी नोंद झाली असून एका प्रभागाची आकडेवारी येण्यासाठी उशिर होत असल्याचे सांगण्यात आले.

तुळापूर ग्रामपंचायतीमध्ये 978 मतदारांपैकी 867 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तेथे 88.65 टक्के इतके सर्वाधिक मतदान घडवून आणण्यात राजकीय नेत्यांना यश आले आहे. कोल्हार खुर्द ग्रामपंचायतची निवडणूक लक्षवेधी ठरत असून तेथेही मतदारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. कोल्हार खुर्द येथे गावपुढार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे 5 हजार 312 मतदारांपैकी 3 हजार 968 मतदारांनी आपल्या मतदानाने गाव नेते निवडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तेथे 74.70 टक्के मतदान झाले असून तेथे अत्यंत चुरस निर्माण झालेली आहे. धक्कादायक निकालाने कोल्हार खुर्दचे नूतन गाव नेते ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

खडांबे खुर्द येथे 2 हजार 744 मतदारांपैकी 2 हजार 180 इतक्या मतदारांनी आपले मतदान दिले आहे. तेथे 79.45 टक्के मतदान झाल्याने चुरस वाढली निकालाची चुरस वाढली आहे. कोंढवड ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 684 मतदारांपैकी 1 हजार 453 इतक्या मतदारांनी आपले मतदान पूर्ण केल्याने 86.28 टक्के इतके उच्चांकी मतदानाची आकडेवारी आहे. मांजरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये चाचा-भतीचे की लढाई मध्ये मतदारांचाही प्रचंड उत्साह दिसून आला. 2 हजार 989 मतदारांपैकी 2 हजार 630 मतदारांनी मतदान दिले. तेथेही 87.99 टक्के मतदान झाले आहे.

बिनविरोध सरपंच व बहुतेक ग्रामपंचायत सदस्य निवड झालेल्या ब्राम्हणगाव भांड ग्रामपंचायतीमध्ये एका प्रभागातच मतदान प्रक्रिया झाली. तेथे असलेल्या 279 मतदारांपैकी 251 म्हणजेच 89.96 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. राहुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक चर्चेच्या ठरत असलेल्या मानोरीमध्येही विक्रमी मतदान झाल्याने नेमके इव्हीएममध्ये कोणाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मानोरी ग्रामपंचायतीसाठी एकूण 3 हजार 448 मतदारांपैकी 3 हजार 37 मतदारांनी आपले मतदान केले. तेथे 88.08 टक्के इतके विक्रमी मतदान झाल्याने निकालही धक्कादायक असेल अशी चर्चा होत आहे.

पारावर निकालाच्या पैंजा सुरू

राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक शांततेत पार पडले. परंतु ग्रामस्थांच्या पारावरील गप्पांचा फड चांगलाच तापला आहे. कोण विजयी होणार यासाठी पैजा सुरू झालेल्या आहेत. केवळ एका दिवसानंतर (दि.20) मतमोजणी होणार असल्याने कोण पैंज जिंकणार कोणता उमेदवार गुलाल उधळणार? याबाबत उत्कंठा वाढलेली आहे.

Back to top button