नगर जिल्ह्यात हॉटेल कर्मचार्‍याची निर्घृण हत्या | पुढारी

नगर जिल्ह्यात हॉटेल कर्मचार्‍याची निर्घृण हत्या

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी येथील नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या हॉटेल साक्षी येथील तंदूर बनविणारा आचारी सोनू थापा (नेपाळ) याची डोक्यात लोखंडी टाॅमीने घाव घालून निर्घृण हत्या झाली. या घटनेमुळे राहुरी परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री हॉटेलमध्ये सोनू थापा याच्यासह मुक्कामी असणारा नामदेव नामक कर्मचारी पसार असल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे.

नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल साक्षीमध्ये सोनू थापा हे आचारी म्हणून गेल्या दोन महिन्यापासून काम पाहत होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे सोनू थापा व हॉटेलमध्ये काम करणारा नामदेव यांनी रात्री 11 नंतर जेवण केल्यानंतर झोपी गेले होते.

शेजारील चहा दुकानदार आपले सामान हॉटेल साक्षी येथे ठेवत होता. सकाळी 7 वाजेच्या सुमारास चहा बनविण्याचे साधन घेण्यासाठी संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी आला असता सोनू थापा यांचा मृतदेह आढळला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस विभागाचे उपअधीक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाने साक्षी हॉटेलशी संलग्न असलेल्या सर्व व्यक्तींची कसून चौकशी केली असता सोनू थापा व नामदेव नामक दोघे कर्मचारी हॉटेल मध्येच मुक्कामी राहत असल्याचे समजले.

रात्री 11 वाजता सोनू थापा व नामदेव हे दोघेही जेवणानंतर झोपले होते. सकाळी संबंधित प्रकार घडल्यानंतर नामदेव हा कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राहुरी पोलिसांचा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील नामदेव नामक व्यक्तीवर संशय बळावला आहे. हॉटेलसह लगतच्या सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे फुटेज प्राप्त करून पोलीस घटनेतील नेमके सत्य शोधत आहेत.

पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी सांगितले की, “लोखंडी वस्तूचा घाव मारत वेटर थापा याची हत्या करण्यात आली आहे. आरोपीचा लवकरच शोध घेऊन त्याला गजाआड केले जाईल”, असे त्यांनी सांगितले.

पहा व्हिडीओ : धनंजय महाडिक यांच्या घरचा गणेशोत्सव

Back to top button