खेड : सुवर्णपदक विजेत्या मुलींची घोड्यावरून मिरवणूक | पुढारी

खेड : सुवर्णपदक विजेत्या मुलींची घोड्यावरून मिरवणूक

खेड : पुढारी वृत्तसेवा : मुले चांगली घडण्यामध्ये अन् वाया जाण्यामध्ये आई-वडिलांचा सहभाग असतो. संस्कारांवरच मुलांचे भवितव्य घडत असते. छोट्याशा गावातील मुलींनी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट खेळ खेळून सुवर्णपदक खेचून आणले, ही सोपी गोष्ट नाही. या यशामुळे गावचे नाव देशपातळीवर चर्चिले जाईल, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. नॅशनल चॅम्पियन किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वायसेवाडी येथील प्रतीक्षा लकडे व राशीन येथील प्रेरणा आंबरुळे व पूर्वा काळे या तिघींनी सुवर्णपदक मिळवले. त्याबद्दल त्यांचा वायसेवाडी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी यादव बोलत होते.

अध्यक्षस्थानी सोमनाथ वाघमारेे होते. तत्पूर्वी प्रतीक्षा लकडे हिची गावातून वाजत-गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांच्या वतीने घोड्यावरून मिरवणूक काढली. कार्यक्रमात तिघीही सुवर्णपदक विजेत्या खेळाडू मुलींचा व त्यांना प्रशिक्षक मिलिंद श्रीराम यांचा पोलिस निरीक्षक यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फुरसुंगी येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये प्रतीक्षा लकडे, प्रेरणा आंबरुळे, पूर्वा काळे या तिघींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

त्यानंतर पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड होऊन चंदीगड युनिव्हर्सिटी, मोहाली (चंदीगड) येथे झालेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये तिघींनीही सुवर्णपदक मिळवले. प्रतीक्षा लकडे 50 किलो वजनगटात, प्रेरणा आंबरुळे 73 किलो वजनगटात तर पूर्वा काळे हिने 80 किलो वजनगटात सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेमध्ये 26 राज्यांच्या 600 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रतीक्षा लकडे, प्रेरणा आंबरुळे, पूर्वा काळे यांची बँकॉक येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय एशियन किक बिक्सिंग स्पर्धेत निवड झाली आहे.
यावेळी नितीन महारनवर, सुनील शेटे, महादेव मोरे, निलेश पावणे, रामदास सुळ, सोमनाथ सुळ, कैलास कायगुडे, छगन सुळ, विष्णू सुळ, मारुती चव्हाण, लाला कायगुडे, दादा दोलताडे, सुरेश कोंडलकर, नवनाथ भिसे, गणपत पाडुळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नितीन महारनवर, सुनील शेटे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नीलेश पावणे यांनी केले, आभार सोमनाथ सुळ यांनी मानले.

Back to top button