भातकुडगाव : भरचौकातील दारूविक्री बंद करा ; मठाचीवाडी ग्रामस्थ आक्रमक | पुढारी

भातकुडगाव : भरचौकातील दारूविक्री बंद करा ; मठाचीवाडी ग्रामस्थ आक्रमक

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा :  सुलतानपूर बु (मठाचीवाडी) येथील भरचौकात अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू असून ती विक्री बंद व्हावी, यासाठी गावातील जागृत नागरिकांनी शेवगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी दि. 9 रोजी निवेदनाव्दारे लक्ष वेधले. यावेळी महिलांही गावच्या दारूबंदीसाठी आग्रही दिसल्या. गावातील जबाबदार पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी यांची गावातील विविध ठिकाणी खुलेआम भर चौकात अवैध दारू विक्री करणाराला मुक संमती आहे. अशाने अनेक दिवसांपासून गावात दारू विक्री करणारांचा आणि दारू पिणारांचा खूप सुळसुळाट झाला. परंतु या गोष्टीकडे गावातील गावपुढार्‍यांचे आजिबात लक्ष नाही . किंवा त्याबद्दल दुर्लक्ष करून एक चकार शब्दही ते काढत नाहीत.

गावातील चौकामध्ये खुलेपणाने राजरोसपणे हे काम चालू आहे. या ठिकाणांवरून अनेक महिला कामांसाठी ये – जा करत असतात त्यांनाही हा त्रास सहन करावा लागतो. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यत येथील बसस्थानकावर उघड राजरोसपणे दारू विक्री केली जाते. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना आणि माता भगिनींना तसेच शाळकरी मुलांना हा त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी दोन ते तीन तरुणांचा मृत्यु या दारुच्या व्यसनामुळे झालेला आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांना वारंवार सांगूनही काहीच फरक पडला नाही.त्यामुळे ग्रामस्थाना आणि त्या चौकाशेजारी राहणार्‍या कुंटुंबाना या ठिकाणी राहणे अवघड होवून बसले आहे.

तसेच गावातील अतिशय कमी वयाच्या मुलांनाही आता दारुचे व्यसन लागले आहे. आणि गावपुढारी मात्र बघ्याची भुमिका घेत आहे, याची दखल पोलिस विभागाने घेऊन गावातील हा व्यवसाय कायमचा हद्दपार करावा व त्यांना प्रोत्साहन देणार्‍या गावपुढार्‍यांनाही समज द्यावी, अन्यथा ग्रामस्थ महिला आणि विद्यार्थी तिव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर कल्याण दिगंबर जगदाळे, आप्पासाहेब सुकासे,अक्षय शिरसाठ, कल्याण दगडु जगदाळे, शहादेव भुमकर, मच्छिंद्र नागे आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Back to top button