संगमनेर : पदवीधर शिक्षकही बनणार केंद्र प्रमुख | पुढारी

संगमनेर : पदवीधर शिक्षकही बनणार केंद्र प्रमुख

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांची 50 टक्के पदे सेवा ज्येष्ठतेने व 50 टक्के पदे विभागीय स्पर्धा परीक्षेतून भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याचा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे यश मिळाले आहे. राज्यात जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, उपस्थिती टिकवणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता 10 जि. पच्या शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्यात आलेले आहे.

2010 मध्ये केंद्र प्रमुख पदभरतीचे प्रमाण सरळसेवा, पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परी क्षेद्वारे अनुक्रमे 40: 30: 30 असे निश्चित करण्यात आले होते. परंतु सदर पद्धतीने पदे भरली जात नसल्यामुळे 100 टक्के पदे भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण बदलून 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परी क्षेद्वारे भरण्याचा निर्णय शासनाने काल जाहीर केला आहे. केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या- त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात येणार आहे.

विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल व ती आवश्यकतेनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. शिक्षकांमधून केंद्रप्रमुख पद भरतीची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने आ. डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली होती. आ. डॉ. तांबे यांनी तत्परतेने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे याबद्दलची आग्रही मागणी मांडली व सातत्याने पाठपुरावा देखील केला. अखेर दीपक केसरकर यांनी ही मागणी मान्य केली आहे. शासन निर्णयाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांमधून केंद्र प्रमुखपद भरतीचा हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटना व शिक्षकांनी आ. डॉ. सुधीर तांबे यांचे आभार मानले आहे.

Back to top button