सिद्धटेक : सोलर पंपासाठी जिल्हा बँकेचा पुढाकार ; जिल्ह्यातील शेतकर्‍यांना करणार कर्जपुरवठा | पुढारी

सिद्धटेक : सोलर पंपासाठी जिल्हा बँकेचा पुढाकार ; जिल्ह्यातील शेतकर्‍यांना करणार कर्जपुरवठा

सिद्धटेक : पुढारी वृत्तसेवा :  शेतीसाठी नियमित वीजपुरवठा होऊन शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान टळावे म्हणून जिल्हा सहकारी बँकेने सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून सोलर पंप कर्ज योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार हा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसे, परिपत्रक सेवा संस्थांना प्राप्त झाल्याची माहिती भांबोरा सेवा संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.
यासाठी बँकेने ज्या कंपन्या व डीलर निश्चित केले, त्यांनी दिलेल्या कोटेशनच्या 80 टक्के कर्ज मंजुरी मिळणार आहे. तसेच,20 टक्के गुंतवणूक ही सभासद शेतकर्‍यांना करावी लागणार आहे. कर्ज कालावधीपर्यंत विमा घेणे सभासदांना बंधनकारक राहणार आहे. विमा न घेतल्यास ती रक्कम सभासदांच्या कर्ज खात्यावर टाकण्यात येणार आहे.

ज्या सभासद शेतकर्‍यांना या योजेनेचा लाभ घ्यायचा आहे, यासाठी त्या शेतकर्‍यांची नावे कमीतकमी एक एकर व जास्ती जास्त पाच एकर क्षेत्र असणे गरजेचे आहे. त्यानुसार सोलरपंपाच्या कर्जाची वर्गवारी करण्यात येणार आहे. ज्या शेतकरी सभासदांना या योजनेचा लाभ घ्यायचा, त्यांनी सेवा संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन संचालक महादेव जांभळे यांनी केले.

कर्जमर्यादा तीन एचपी ते दहा एचपीपर्यंत

सोलर पंप कर्जमर्यादा तीन एचपी ते दहा एचपीपर्यंत उपलब्ध असून, सरासरी दराप्रमाणे सभासद शेतकर्‍यास दोन लाख ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. या कर्जाचा परतफेडीचा कालावधी सात ते दहा वर्षांपर्यंतचा आहे.
तर, व्याज दर नियमित कर्जदारासाठी 10 टक्के व थकीत गेल्यास 12 टक्के राहाणार आहे.

Back to top button