संगमनेर : पुलासह रस्त्यांना निधी न दिल्यास उपोषण | पुढारी

संगमनेर : पुलासह रस्त्यांना निधी न दिल्यास उपोषण

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : दमदार पावसाने हिवरगाव पावसा परिसरात सर्व बंधारे भरले आहे. परतीच्या पावसामुळे हिवरगाव पावसा येथील तीन पूल पाण्याखाली गेले होते. ओढ्यावर नवीन उंच पूल बांधण्यासह चिखलमय रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करणे, जलमय रस्त्यांवर सिमेंट पाईप टाकण्यासाठी तत्काळ निधी देण्याची मागणी म. फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू विचारमंचने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान, निधी न मिळाल्यास संघटनांमार्फत ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाचा इशारा अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

हिवरगाव पावसा ते देवगड देवस्थान रस्त्यावर पूल, उंबरवाडी रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालया जवळचा पूल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व म्हसोबाचे पडित वस्तीकडे जाणारे रस्ते नेहमी पाण्याखाली जातात. सदरच्या रस्त्याने ये-जा करणे धोकादायक होते.
हिवरगाव पावसा ते देवगड देवस्थान रस्त्यावर भाविकांची मोठी वर्दळ असते. हा पूल भाविक व देवगड विद्यालयात जाण्यार्‍या शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरतो. हिवरगाव पावसा ते देवगड देवस्थान रस्त्यावर उंच पुलाची आवश्यकता आहे. इतर तीन, चार ठिकाणी उंच पुलांची आवश्यकता आहे.

उंबरवाडी रस्त्यावरील ग्रामपंचायत कार्यालया जवळचा पूल, आमरधामजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरकडे जाणारा रस्ता नेहमी पाण्याखाली जातो. तेथे उंच पुलाची आवश्यकता आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शासनाने उंच पुलासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Back to top button