राहुरीत अधिकार्‍यांचा गोंधळात-गोंधळ..! | पुढारी

राहुरीत अधिकार्‍यांचा गोंधळात-गोंधळ..!

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरीच्या प्रशासकीय यंत्रणेचा सावळा गोंधळ सर्वसामान्यांना कळेनासा झाला आहे. महसूल, पोलिस, नगरपरिषद, पंचायत समिती, बांधकाम, वन व पशू वैद्यकीय विभागामध्ये सुरू असलेला गोंधळात-गोंधळ सर्वसामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, प्रशासकीय कामकाजामध्ये कुणाचा दबाव आहे? कुणाच्या रिमोटवर प्रशासनाचा कारभार हाकला जातोय, अशा प्रश्नांवर सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगत आहे.

राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा हद्दीमध्ये रेशनच्या तांदळाची मोठी कारवाई पोलिसांनी केली. तब्बल 5 लाख रूपयांचा रेशनचा तांदूळ एका ट्रकमध्ये आढळला. पोलिस कारवाईनंतर ही माहिती सोशल मीडियामध्ये पसरली. 24 तास उलटल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून अनेकांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला.

दरम्यान, गुन्हा दाखल झाला, परंतु रेशनच्या तांदळाचा उल्लेख टाळण्यात आला. महसूल प्रशासनाने पकडलेल्या तांदळाची चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. परिणामी तांदूळ प्रकरणी दोन्ही संशयित काही तासातच जामिनावर बाहेर आले. यानंतर तांदूळ प्रकरणाची संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगली. यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दडपण आणल्याची चर्चा सर्वत्र झाली. गुन्हा दाखल होताच अल्पावधीत संशयितांना सोडण्यात आले. तांदूळ प्रकरण कशा पद्धतीने रफादफा झाले, याची चर्चा होत असताना या पोठोपाठ महसूल प्रशासनातही एका कारवाईची चर्चा रंगली.

देसवंडी हद्दीत मुळा पात्रात मंडलाधिकारी व तलाठी यांनी एकत्र कारवाई केली. जेसीबी, पोकलॅनसह तीन ट्रॅक्टर पकडल्यानंतर महसूलच्या जम्बो कारवाईचे सोशल मीडियामध्ये स्वागत सुरू झाले, परंतु काही तासानंतर ही वाहने नेण्यात आली की, पळवून लावली, याबाबत चर्चा रंगली. सोशल मीडियामध्ये या कारवाईबाबत वेगवेगळ्या शंका- कुशंका व्यक्त झाल्या. पोलिस कारवाईप्रमाणे महसुलची कारवाईसुद्धा एक फार्स ठरल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये झाली. राहुरी पोलिस व महसूल प्रशासनावर अंकुश कुणाचा, याबाबत पारावरच्या बैठकीत तंबाखू चोळत गप्पा रंगत आहेत.

राहुरी नगरपरिषद प्रशासनानेही अचानक अतिक्रमण हटाओ म्हणत, शहरात अंतर्गत रस्त्यांवर जेसीबी फिरवला. धनदांडग्यांचे अतिक्रमण जैसे- थे ठेवत रस्त्यांलगत छोट्या- मोठ्या टपर्‍या, हातगाड्यांसह ठोकलेले पाल उखडून टाकले. केवळ एका दिवसाची नौटंकी करीत अतिक्रमण हटाव मोहिमेचा फार्स दाखविला. दुसर्‍या दिवशी पुन्हा शहरात अतिक्रमणाची जैसे- थे अवस्था होत रस्ते पुन्हा अडविण्यात आले.

दरम्यान, पालिकेच्या कारवाईबाबतही सर्वसामान्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सद्यस्थितीला पालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे. तरी पालिकेतील अधिकार्‍यांना अशा पद्धतीने फार्सची कारवाई करण्यास कोण सांगतेय, अशी चर्चा शहर हद्दीत होत आहे.
यात वन विभागही अपवाद राहिला नाही. जबाबदारीला कोलदांडा लावत वृक्षतोड करणार्‍यांना वन विभागाने अभय दिले. जेथे जंगल तेथे वृक्षतोड हे चित्र राहुरी परिसरात दिसत आहे. बिबट्याचा सर्रास वावर होत असताना पिंजरे मागणीस शेतकर्‍यांना ‘लक्ष्मी दर्शन’ द्यावे लागत असल्याची चर्चा आहे. यामुळे वन विभागाचे वृक्षतोड व बिबट्यांकडे होणार्‍या दुर्लक्षाबाबत कोणीही ब्र शब्द काढत नसल्याचे चित्र दिसत आहे.

जनावरांना लंपीचे संक्रमण झाले. दैनंदिन जनावरे मृत्युमुखी पडत असताना राहुरीत पशुसंवर्धन विभागामध्ये अनेक दिवसांपासून पशू सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकारी फिरकत नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होऊनही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राहुरी पंचायत समिती असो की, सार्वजनिक बांधकाम विभागातही असाच गुंता सुरू आहे. मान्सून हंगामानंतर रस्त्यांची दैना उडाल्यानंतरही साबां अभियंता व कर्मचार्‍यांना कोणतेही देणे- घेणे नसल्याचे वास्तव समोर येत आहे. सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये सावळा गोंधळ सर्वसामान्यांना कळेणासा झाल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांचे रिमोट कंट्रोल कोणाला लाभले, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

गौण खनिज उत्खनन बंद तरी ‘भाऊ’ जोमात !

‘राहुरी शहर, डिग्रस व बारागाव नांदूर हद्दीमध्ये पेालिस व महसूल प्रशासन माझ्या खिशात,’ असे सांगत तो ‘भाऊ’ जोमाना मुरूम, मातीसह वाळू उचलेगिरीत अग्रेसर झाला आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी गौण खनिज उत्खननाबाबत सक्त कारवाईचे आदेश दिले असताना ‘भाऊ’वर मेहेरबानी कोणाची, अशी कुजबूज सुरू आहे.

Back to top button