नगर :  बोगस विमान तिकिटे देऊन प्रवाशांना गंडा | पुढारी

नगर :  बोगस विमान तिकिटे देऊन प्रवाशांना गंडा

राजेंद्र जाधव

नगर :  तिरुपती बालाजीला जाण्यासाठी विमानाचे तिकीट देऊन संगमनेर तालुक्यातील खळी गावच्या एका पप्पू उर्फ श्लोक नामक व्यक्तीने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, कोळपेवाडीच्या अनेक नागरिकांना विमानाची बनावट तिकिटे देऊन लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमान प्रवास करणार्‍या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील दोन वर्ष कोरोना परिस्थिती असल्यामुळे पर्यटन जवळपास बंदच असल्यामुळे अनेक देवस्थानांची मंदिरांची दरवाजे देखील भक्तांसाठी बंद होती.

मात्र 2022 च्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली गेल्यामुळे शासनाकडून दोन वर्षापासून टाकण्यात आलेले निर्बंध देखील मागे घेण्यात आले. त्यामुळे पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची आणि भक्तांना प्रसिद्ध देवतांच्या दर्शनाची आस भक्तांना लागली होती. त्याच संधीचा फायदा घेऊन संगमनेर तालुक्यातील एका पप्पू नामक व्यक्तीने तिरुपती बालाजीला जाण्यासाठी ‘स्पाईस जेट’ व ‘इंडिगो’ या कंपनीचे बनावट तिकिटे देऊन मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 20 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजीला मानणारे देशविदेशात कोट्यवधी भक्त आहेत. त्यामुळे बालाजीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी रेल्वेने व खासगी वाहनाने जाणार्‍या प्रवाशांबरोबरच विमानाने जाणार्‍या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. शिर्डीवरून तिरुपतीला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध असल्यामुळे अनेक बालाजी भक्त विमानाने तिरुपतीला नेहमी जात असतात.

याची माहिती घेऊन या पप्पू नामक व्यक्तीने ‘स्पाईस जेट’ व ‘इंडिगो’ या कंपनीची स्कीम असून पाच हजार रुपयात परतीचा प्रवास व हॉटेल आरक्षण सेवा देण्याची सुरेगाव, कोळपेवाडीतील काही व्यक्तींना फोनवरून दिलेल्या माहितीच्या आधारावर काही व्यक्तींनी 12 एप्रिल 2022 रोजी या पप्पू नामक व्यक्तीला 28 व्यक्तींच्या तिरुपती विमान प्रवासाच्या तिकिटासाठी 1 लाख 40 हजार व हॉटेल बुकिंगचे 50 असे एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचे पेमेंट ऑनलाईन अदा केले. यामध्ये शिर्डी-तिरुपती स्पाईस जेट दुपारी 3.30 ने 10 व्यक्ती व पुणे तिरुपती इंडीगो सकाळी 7.30 वा. विमानाने 28 व्यक्तींचे 2 जुलैसाठी या पप्पुकडून बुकिंग करण्यात आले होते.

मात्र ज्यावेळी 18 व्यक्ती तिरुपती बालाजीला पुणे विमानतळावर पोहचल्या. त्यावेळी त्यांच्यासाठी कोणतेही तिकीट आरक्षित नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी त्या पप्पुशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा 18 व्यक्तींनी या पप्पुशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत विमानाचे उड्डाण होत नाही तोपर्यंत या पप्पूने फोनवर संपर्क केला नाही. विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळाने संपर्क करून तांत्रिक चूक झाली असून दुसरे तिकीट देतो, असे सांगून वेळ मारून नेली.

त्या प्रवाशांना देखील त्यावेळी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्या प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व लहान मुलांचा समावेश होता. त्यावेळी फसवणूक झालेल्या या नागरिकांनी उर्वरित दुपारी 3.30 च्या फ्लाईटने तिरुपतीला जाणार्‍या सबंधितांना विमान तिकीट बनावट असल्याचे सांगितले. त्यावेळी या 10 व्यक्तींनी आपल्या तिकीटाची खातरजमा केल्यानंतर त्याचे देखील तिकीट बनावट असल्याचे त्यांना समजले.

त्यामुळे ज्या व्यक्तींनी सप्टेंबर महिन्यांसाठी तिकीट बुकिंग केली आहे. त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी या पप्पुकडे दिलेले पैसे परत मागितले. मात्र ‘आज देतो, उद्या देतो’ असे सांगत हा पप्पू या लोकांना लुबाडण्यात यशस्वी झाला आहे. यामध्ये या पप्पूबरोबरच विमान कंपन्यांचे काही अधिकारी सामील आहेत का? याचा देखील आढावा दैनिक पुढारी घेणार असून या पप्पूचा इतिहास मांडताना या प्रकरणाची अधिक माहिती पुढर्च्या भागात करणार आहे.

ना हॉटेल, ना परतीचे तिकीट
तिकीट बनावट असल्याचे कळल्याने फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पप्पुशी संपर्क केला असता आपला भांडाफोड होऊ नये, म्हणून तत्काळ नवीन खर्‍या तिकीटाची व्यवस्था केली. मात्र ज्यावेळी या व्यक्ती तिरुपती विमानतळावर पोहोचले असता त्यांच्यासाठी परतीचे तिकीट आरक्षित केलेले नव्हते व कोणत्याही प्रकारचे हॉटेल देखील आरक्षित केलेले नव्हते. त्यामुळे सर्वच 28 प्रवाशांची फसवणूक झाली असल्याचे निष्पन्न झाले.

Back to top button