वाळकी : तालुक्यात सरपंच पदासाठी 13 अर्ज; अवघे 2 दिवस शिल्लक | पुढारी

वाळकी : तालुक्यात सरपंच पदासाठी 13 अर्ज; अवघे 2 दिवस शिल्लक

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट जनतेतून सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी (दि.30) तिसर्‍या दिवसाअखेर सरपंच पदासाठी 13, तर सदस्य पदासाठी 49 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केले आहेत. आता अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.

तालुक्यातील सोनेवाडी (चास), कापूरवाडी, पिंपळगाव कौडा, बाबुर्डी बेंद, दहिगाव, आगडगाव, पांगरमल, मदडगाव, खातगाव टाकळी, सोनेवाडी (पि.ला.), सारोळा कासार, शेंडी, आठवड, साकत खुर्द, वाळकी, जखणगाव, कौडगाव/जांब, नारायणडोहो, सारोळाबद्दी. उक्कडगाव, राळेगण (म्हसोबा), नेप्ती, रांजणी, पिंपळगाव लांडगा, टाकळी खातगाव, वडगाव तांदळी, नांदगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होईल.

ऑनलाईन प्रक्रियेमुळे इच्छुकांचा गोंधळ
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. या प्रक्रियेमुळे इच्छुकांचा सध्या चांगलाच गोंधळ उडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज, जातीचा दाखला, स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण, गुन्हेगारी संदर्भातील माहिती, अपत्यांबाबतचे स्व-घोषणापत्र, शिक्षणाची माहिती हे सर्व निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट व सर्व साक्षांकित प्रती या ऑफलाईन पद्धतीने नगर तहसील कार्यालयात निर्धारित वेळेत संबधित गावच्या निवडणुक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केल्यावर उमेदवारी अर्ज दाखल झाला, असे मानले जात आहे. या किचकट प्रक्रियेमुळे इच्छुक उमेदवारांच्या झोपा उडाल्या आहेत.

तीन दिवसांतील उमेदवारी अर्ज
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून गेल्या तीन दिवसांत सरपंचपदासाठी 13 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये वाळकी 4, नेप्ती 1, नांदगाव 1, जखणगाव 1, टाकळी खातगाव 3, मदडगाव 2, सारोळा बद्धी 1 अशा अर्जांचा समावेश आहे. सदस्य पदासाठी मंगळवारी 4 आणि बुधवारी 45 असे तिसर्‍या दिवसाअखेर एकूण 49 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

Back to top button