कुकाणा : देवगाव शिवारात अपघात; विद्यार्थी ठार | पुढारी

कुकाणा : देवगाव शिवारात अपघात; विद्यार्थी ठार

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : क्रीडा स्पर्धा खेळून घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला नादुरुस्त उभा असलेल्या उसाच्या ट्रेलरला शालेय विद्यार्थ्यांची दुचाकी समोरून धडकल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. जिजामाता माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेला सुरज पंढरीनाथ निकम (वय 15, राहणार देवगाव) हा विद्यार्थी आपला मित्र नयन गणेश शिंदे (वय 15, राहणार शहापूर) हे दोघे सोनई येथे शालेय क्रीडा स्पर्धा असल्याने (दि 29 ) रोजी सकाळी नऊ वाजता आपल्या घरून जिजामाता महाविद्यालय भेंडा या ठिकाणी दुचाकीवर गेले होते.

विद्यालयातून क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी चार चाकी वाहनाने सोनई येथे गेले. त्यानंतर क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा विद्यालयात येऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवर देवगाव-सौंदाळा रोडने जात असताना हॉटेल पैलवान जवळ नादुरुस्त झालेल्या रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या उसाच्या ट्रेलरला समोरून जाऊन धडकले. या अपघातात दुचाकीवरील विद्यार्थी सुरज व नयन गंभीर जखमी झाले. त्यांना ज्ञानेश्वर कारखान्याला कामावर जाणार्‍या कर्मचार्‍यांनी मदत करून नगर येथील खाजगी रुग्णालयात भरती केले होते.

त्यातील सुरज पंढरीनाथ निकम याच्या डोक्याला जबर इजा झाल्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ( दि. 30) रोजी सायंकाळी पाच वाजता त्याचा मृत्यू झाला, तर नयन शिंदे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सुरज याच्यावर देवगाव येथे शोकाकुल वातावरणात रात्री 10 वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरज हा नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध पहिलवान कचरू निकम यांचा नातू, तर देवगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच महेश निकम यांचा पुतण्या होता. या घटनेने देवगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button