नगर जिल्ह्यातील 21 संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक! | पुढारी

नगर जिल्ह्यातील 21 संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक!

नगर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ग्रामपंचायती आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी लागल्याने यातून गावोगावी तणाव निर्माण होऊ शकतो, या भीतीतून सरकारने सहकारातील निवडणूका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश काढले आहेत. यानुसार, जिल्ह्यातील शहर बँकेसह कोपरगाव पिपल्स बँक, जामखेड, श्रीगोंद्याचे खरेदी विक्री संघ अशा 21 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला आहे. सध्या राज्यात 7143 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागला आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत नगर जिल्ह्यातही 21 सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यात अ आणि ब वर्गातील संस्थांचा समावेश आहे. सहकारातील अशा बहुचर्चित संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकारण तापू लागले होते. यातील शहर बँकेची निवडणूक तर चांगलीच रंगात आली होती. निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. माघारीही झाली होती. तर मर्चट बँकेचाही प्रोग्राम लागला होता. याशिवाय छत्रपती ग्रामसेवक पतपेढी, शासकीय अभियंता पतपेढी, श्रीगोंदा रुख्मीणी बँक, स्वामी समर्थ पारनेर यांसह जामखेड खरेदी विक्री संघ, श्रीगोंदा खरेदी विक्री संघ, कोपरगाव पिपल्स बँकेच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला होता.

शहर बँकेच्या इच्छुकांचा हिरमोड!
जिल्ह्यात सहकारी बँकांचा तसेच सेवकांच्या पतसंस्थांचा निवडणूक कार्यक्रम लागला होता. येथील अ आणि ब वर्गातील 21 संस्थांचा निवडणुकीत समावेश होता. शहर बँकेसाठी 11 डिसेंबरला मतदान होणार होते. काल उमेदवारांना चिन्हांचे वाटपही करण्यात आले. तर मर्चंट बँकेसाठीही इच्छुकांची चाचपणी सुरू झाली होती. मात्र आता निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

तणाव नको, म्हणून शासनाची सतर्कता!
ग्रामपंचायती आणि सहकारातील निवडणुका सोबत आल्या आहेत. त्यामुळे गावांत तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, तसेच संबंधित सहकारी संस्थांची सभासद संख्या मोठी आहे. तसेच या संस्थांचे कार्यक्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे अनेक मतदार हे मतदानापासूच वंचित राहू शकतात. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश विशेष कार्यकारी अधिकारी व सहकारी निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी केले आहेत. या आदेशानुसार नगरमधील 21संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

जिल्ह्यातील शहर बँक, मर्चट बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर थांबविण्यात येत आहेत.
                                                            – गणेश पुरी,
                                                  उपनिबंधक सहकार विभाग

Back to top button