नगर: पोलिस भरतीचे सर्व्हर डाऊन! उमेदवारांची होतेय दमछाक; अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस | पुढारी

नगर: पोलिस भरतीचे सर्व्हर डाऊन! उमेदवारांची होतेय दमछाक; अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

नगर, पुढारी वृत्तसेवा: पोलिस भरतीची अर्जप्रक्रिया सुरु असून, आता अर्जकरण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच गेल्या आठवडाभरापासून अर्ज प्रक्रियेचे सर्व्हर डाउन असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. उमेदवारांसह सायबर कॅफे चालकही हैराण झाले आहेत.

रात्र जागून काढण्याची वेळ

पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार नेट कॅफेवर दिवसभर ताटकळत बसत असल्याचे चित्र आहे. दिवसभर प्रयत्न करुनही फॉर्म भरला जात नसल्याने रात्री जागून फॉर्म भरावे लागत आहेत.

पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक असल्याने सोमवारी (दि. २७) शहरातील नेट कॅफेवर गर्दी दिसून आली. फॉर्म भरताना व पेमेंट करताना अडचणी येत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणीही उमेदवारांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात १३९ जागा रिक्त

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या पोलिस दलातील भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ९ नोव्हेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील १२९ पोलिस शिपाई व १० पोलिस चालक शिपाई अशा १३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असून, केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असताना पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. अर्ज सादर करताना पोलिस भरतीची साइट चालू-बंद होत असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

Back to top button