कारवाईमुळे मालमत्ता हडपण्याला लगाम, सर्वसामान्यांना दिलासा; पालकमंत्र्यांकडून दखल | पुढारी

कारवाईमुळे मालमत्ता हडपण्याला लगाम, सर्वसामान्यांना दिलासा; पालकमंत्र्यांकडून दखल

नेवासा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील वाळूतस्करीनंतर आता लॅण्ड माफियांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नेवासा फाट्यावरील मोक्याच्या ठिकाणची 35 गुंठे जागा हडपण्याच्या प्रकारात लॅण्ड माफियासह नगररचना ,भूमीअभिलेख व महसूल यंत्रणांच्या कारभाराकडेही तक्रारदारांनी बोट दाखवले आहे. या प्रकरणी पालकमंत्री व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दखल घेतल्याने स्थानिक सरकारी यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली. सामान्य जनतेच्या मालमत्ता बळकावण्याच्या प्रकारास यामुळे मात्र आळा बसणार आहे.

नेवासा फाट्यावरील 35 गुंठे जागा धमकावत व बनावट चतुःसीमा करून बळकवण्याच्या आरोपावरून नेवासा पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तालुक्यात लॅण्ड माफियांच्या दादागिरीचा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे नगर रचना, नेवासा भूमी अभिलेख व महसूल यंत्रणांच्या कर्मचार्‍यांना हाताशी धरूनच हा प्रकार केला जात असल्याचे या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानेश्वर वसंत घुले यांनी तक्रारीत नमूद केले. वरील सरकारी यंत्रणेबद्दलही जनतेतून संताप व्यक्त करण्यात येऊ लागला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेवासा दौर्‍यात वाळूतस्करीचा भांडाफोड झाला. मंडलाधिकारी व तलाठ्यावर या प्रकरणी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर वाळूतस्करांची पाळेमुळे शोधून लगाम घालण्यात सरकारी यंत्रणेला यश आले, पण त्यासाठी पालकमंत्र्यांच्या आदेशाची वाट बघावी लागते, हाही आश्चर्याचाच भाग आहे. तालुक्यातल्या वाळूतस्करीचा धुराळा थांबतो न थांबतो तोच आता तालुक्यातल्या लॅण्ड माफियांचा धुमाकूळ समोर आला आहे.

नेवासा फाट्यावरील 35 गुंठे जागेवरून या प्रकाराला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे याही प्रकरणात पालकमंत्री विखे व पोलिस अधीक्षक राकेश एाला यांचीच भूमिका मत्त्वाची ठरली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून तक्रारदार स्थानिक सरकारी यंत्रणेकडे हेलपाटे मारून दाद मिळत नसल्याचे दिसताच थेट पालकमंत्री विखे यांच्याकडे व नंतर पोलिस अधीक्षकांना भेटताच या प्रकरणी कारवाईस गती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल झाला.तो दाखल होण्यासाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली.

पालकमंत्री विखे व जिल्हा पोलिस अधीक्षक एाला यांची भेट घेतल्यानंतर तत्परतेने कारवाई झाली. नगररचना, नेवासा भूमी अभिलेख,व महसूल यातील काही कर्मचार्‍यांचे लॅण्ड माफियांशी संबंध असून, त्यातूनच जनतेची मालमत्ता बळकावण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रवृत्तींना राजाश्रय मिळू नये, अशी अपेक्षा आहे.
– डॉ करणसिंह घुले, समर्पण फाऊंडेशन, नेवासा

गांभिर्याने दखल अन् तत्परतेने कारवाई

तक्रारदार कुटुंबियांच्यावतीने या प्रकरणी गंभीरतेने दखल घेत तत्परतेने कारवाई केल्याने पालकमंत्री विखे यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले आहे.वाळु तस्करांवर कारवाईसाठी पालकमंत्री विखे यांनाच आदेश देण्याची वेळ आली. या प्रकरणी पोलिस अधीक्षक एाला यांनीही त्वरित दखल घेतल्याने आता तालुक्यातील जमीन हडपण्याचे असे बरेचसे प्रकार पुढे येणार आहेत.

Back to top button