राहुरीच्या पूर्व भागात बैठकांचे सत्र ; ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती | पुढारी

राहुरीच्या पूर्व भागात बैठकांचे सत्र ; ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती

वळण : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आरडगाव, मानोरी, केंदळ खुर्द, मांजरी व कोंढवड  या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूक 20 डिसेंबर रोजी होत असल्याने गाव पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.  बहुतेक ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार असल्याने येथे इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला आहे. तरी देखील आपल्या धर्म पत्नीला खुर्चीत बसवून स्वतःच गावगाडा चालविण्याच्या इराद्याने अनेकांनी डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. आरडगावचे सरपंच पद हे सर्वसाधारण महिला राखीव आहे.

येथे जनसेवा मंडळ , विकास मंडळ व  वंचित बहुजन आघाडी असे तीन प्रबळ गट आहेत. पण ऐनवेळी तिरंगी वा दुरंगी लढतीत सत्ताधारी जनसेवा मंडळाला शह देण्यास विकास मंडळ व वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन लढा देण्याची शक्यता आहे. मानोरीचे सरपंच पद हेही सर्वसाधारण महिला राखीव असल्याने नेतेमंडळी धर्मपत्नीला सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्यासाठी मंडळाकडे आपणच कसे योग्य आहोत, ही आग्रही भूमिका मांडत आहेत.

मांजरीचे सरपंच पद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. सरपंच नाही तर उपसरपंच पद तरी मिळून ग्रामपंचायत सत्ता आपल्या अधिपत्याखाली आणण्यास पारंपरिक विरोधक एकमेकांविरुद्ध दंड थोपटून कामाला लागले आहेत. केंदळ खुर्द  सरपंच पद अनुसूचित जाती व्यक्ती करिता राखीव असल्याने सर्वसाधारण गटातील इच्छुकांचा  हिरमोड झाला. अद्याप केंदळ मध्ये कुठल्याही बैठका वा उमेदवारांची जुळवाजुळव झाल्याचे दिसत नाही. दोन्हीकडची मंडळी अजून अवधी आहे, पाहू, करू, बसू, अशाच निरुत्साही भावना व्यक्त करीत आहेत. कोंढवडमध्ये मात्र उत्साह आहे.

येथे सरपंच पद हे सर्वसाधारण व्यक्तीस राखीव असल्याने अनेकांनी जुळवाजुळव करून चाचणी सुरू केली आहे. एकंदरीत राहुरीच्या पूर्व भागात हसलेल्या पाच ग्रामपंचायत पैकी मानोरी, आरडगाव व मांजरीत महिलाराज येणार आहे.

 

Back to top button