नगर जिल्ह्यात 411 वित्तीय संस्थांना ओहोटी ! 411 संस्थांचे 69.77 कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद | पुढारी

नगर जिल्ह्यात 411 वित्तीय संस्थांना ओहोटी ! 411 संस्थांचे 69.77 कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद

गोरक्षनाथ शेजूळ : 

नगर :  सहकार चळवळीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नगर जिल्ह्यात आज 4154 वित्तीय संस्था आपला पारदर्शी कारभार आणि सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर दिमाखात उभ्या आहेत. तर, 411 संस्था अक्षरशः डबघाईस गेल्या आहेत. संबंधित 411 संस्थांचे 69.77 कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद आढळले असून, यापैकी 283 संस्थांच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी पाच संस्थांही पोलिस प्रशासनाच्या रडारवर आहेत. ‘विना सहकार, नही उद्धार’ हे ब्रीद घेऊन जिल्ह्यात सहकार चळवळ गतिमान झाली आहे. बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, नोकरदार संस्था, मजूर संस्था, गृहनिर्माण संस्था अशा तब्बल 4154 वित्तीय संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये संचालक मंडळावर विश्वास ठेवून ठेवीदार ठेवी ठेवतात.

हेच सभासद संस्थेत आपले व्यवहार करतात. यातून कर्जदारांना कर्ज पुरवठाही केला जातो. कर्जावरील व्याजातून मिळणार्‍या नफ्यातून संस्था चालविली जाते. मात्र, गेल्या काही दशकांचा विचार केला असता जिल्ह्यात संस्था चालकांनी केलेल्या चुकीच्या कारभारामुळे त्याचे परिणाम ठेवीदार, सभासदांनाही भोगावे लागले आहेत. सोनेतारणातील घोटाळे असतील, किंवा नातेवाईकांना दिलेले नियमबाह्य कर्ज, त्यातून वसुलीवेळी आलेली अडचण, पुढे अवसायानात निघालेल्या संस्था, असेही प्रकार दिसले.

संस्थाच करते ऑडिटरची निवड

संस्थांच्या वार्षिक लेखा परीक्षणासाठी पूर्वी सहकारातील अधिकार्‍यांची नियुक्ती होत होती. मात्र, 97 व्या घटनादुरुस्तीमुळे संबंधित संस्थांच आता वार्षिक सभेत ठराव करून आपला ऑडिटर निवडत आहेत. त्यासाठी संस्था शासनाने ठरवून दिलेली फी अदा करत आहे.

ऑडिटरवर दबाव?

संस्थांचे ऑडिट मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा असते. यासाठी ‘लेखा परीक्षकांना’ संस्था चालकांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचेही बोलले जाते. एकदा काम मिळाल्यानंतर पुढच्या वर्षीही संस्थेचे हे ऑडिट आपल्यालाच मिळावे, अशी अपेक्षा असल्याने, संस्थेतील चुकीचा कारभार पुढे आणण्याचे धाडस सहसा ऑडिटर करत नाही.

तक्रारी अन् सरकारी लेखापरीक्षण !

संस्थांचे लेखापरीक्षण संस्थांनी नेमलेले लेखापरीक्षक (ऑडिटर) करतात. मात्र, यावरही अनेक तक्रारी सहकार विभागाकडे जातात. त्यावर सहकार आयुक्त, उपनिबंधक, सहायक निबंधक गरजेनुसार पुन्हा स्वतंत्रपणे संबंधित संस्थेचे लेखापरीक्षण करतात. विशेष म्हणजे या लेखापरीक्षणात बहुतांशी संस्थांचा पर्दाफाश झाल्याचेही पुढे आले आहे.

283 संस्थांमध्ये 56 कोटींचा घोटाळा !

जिल्ह्यातील पतसंस्था, नागरी बँका, वि. का. सोसायट्या इत्यादी प्रकारातील 283 वित्तीय संस्थांबाबत सहकार विभागाकडे तक्रारी आल्या. यातून पुन्हा सहकारातून लेखापरीक्षण झाले. या अहवालात आर्थिक व्यवहारात अनियमितता, नियमांची पायमल्ली, अफरातफर आढळली. सहायक निबंधकांच्या आदेशान्वये आणि लेखापरिक्षकांनी स्वतः फिर्याद दिल्याने संबंधित 283 संस्था चालकांवर 55.91 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

120 संस्थांच्या 21 कोटींवर आक्षेप !

नगर जिल्ह्यात 120 वित्तीय संस्थांमधील 21.24 कोटींच्या आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाने बोट ठेवले होते. यातून कारवाईही झाली. यात पुढे न्यायायीन लढा सुरू झाला. आजही तो सुरूच आहे.

411 संस्था; 70 कोटीच्या व्यवहाराची चौकशी

जिल्ह्यात 283 संस्थांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 120 संस्थांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. 17 संस्थांचे लेखापरीक्षण सुरू आहे. अशाप्रकारे 411 संस्थांचे तब्बल 69.77 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहार संशयास्पद दिसले.

चार संस्थांवर गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ?

जिल्हा विशेष लेखापरीक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव नं. 1 वि. का. मर्या घोडेगाव, ता. श्रीगोंदा, स्वामी समर्थ ग्रा. बि.शेती मर्या. काष्टी, सीना परिसर नागरी पतसंस्था मर्या मिरजगाव, अभिनव बँक, राहुरी आाणि राहुरी तालुका जिजामाता पतसंस्था, या संस्थांच्या व्यवहारावरून गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यांकडे ‘सहकार’चा पाठपुरावा सुरू आहे. यातील ‘राजामाता’वर गुन्हा दाखल झाला असून, अन्य चार संस्थांबाबत पोलिस प्रशासनावर ‘राजकीय’ दबाव आहे का? याविषयीही चर्चा सुरू आहे.

चांगल्या कारभाराचे कौतुकही हवे!

एकीकडे संस्था अवसायानात जात असताना, दुसरीकडे काही संस्थांनी आपल्या स्वच्छ कारभारातून देशात नावलौकीक मिळवला आहे. श्रीरेणुकामाता मल्टिस्टेटचे संस्थापक प्रशांत भालेराव यांनी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही आपला विस्तार केला आहे. साईआदर्शचे शिवाजीराव कपाळे यांनीही 18 शाखा स्थापन करून घोडदौड सुरूच ठेवली आहे. यासह सुरेशराव वाबळे यांची ‘प्रेरणा’, काका कोयटेंची ‘समता’, रविकाका बोरावकेंची ‘ज्योती’, सर्वच महिला संचालिका असलेली व 100 कोटींच्या ठेवी पार केलेली ‘अंबिका’, या संस्था आज सहकारात आदर्श म्हणून पुढे येताना दिसत आहेत.

वित्तीय संस्थांचे लेखापरीक्षण हे संबंधित संस्थेने नियुक्त केलेल्या ऑडिटरकडून केले जाते. मात्र, त्यावरही तक्रारी आल्या तर, सहकार विभागाकडून लेखापरीक्षण होते. आतापर्यंत 283 संस्थांच्या चुकीच्या व्यवहार प्रकरणात पोलिसांत गुन्हे दाखल झालेले आहेत. यात सहकारातील लेखापरीक्षक हेच फिर्यादी असतात.
                                            – राजेंद्र निकम, जिल्हा विशेष लेखापरीक्षक

Back to top button