यांत्रिक बोटींना ‘भीमे’त जलसमाधी ; कर्जत-दौंड महसूलची संयुक्त कारवाई | पुढारी

यांत्रिक बोटींना ‘भीमे’त जलसमाधी ; कर्जत-दौंड महसूलची संयुक्त कारवाई

खेड : पुढारी वृत्तसेवा :  भीमा नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपशावर कर्जत व दौंडच्या महसूल विभागाने संयुक्तपणे कारवाई केली आहे. भीमेत अवैध उपसा करणार्‍या दोन फायबर यांत्रिक बोटी व एक सक्शन बोटीवर कारवाई करून या बोटींना जलसमाधी देण्यात आली. दोन वाळू तस्करांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कर्जतच्या महसूल पथकाकडून देण्यात आली. अंकुश ठोंबरे (रा.गणेशवाडी, ता.कर्जत) व भरत शेंडगे (रा.वाटलूज (ता.दौंड) अशी या तस्करांची नावे असून, त्यांच्यावर अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याने गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार दौंड यांच्याकडून सुरू असल्याची माहिती महसूलकडून देण्यात आली.

भीमा नदीपात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत कर्जतच्या महसूल विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या अनुषंगाने कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सकाळपासूनच कारवाईसाठी नदीपात्रात उतरून कंबर कसली होती. महसूल पथक भीमेत कारवाईसाठी येत असल्याची खबर तस्करांना लागली असली, तरी आगळे यांनी वाळू तस्करांचा आढावा घेतला. यांत्रिक बोटींचे दौंड तालुक्यात पलायन झाल्याने तहसीलदार आगळे यांनी दौंडच्या महसूल पथकलाही कारवाईत सामील करून घेतले. त्यानंतर संयुक्त कारवाई करताना या पथकाने दौंड हद्दीत असलेल्या दोन फायबर यांत्रिक बोटी व एक सक्शन बोट पकडून त्यावर कारवाई करीत जलसमाधी दिली.

जामखेड-कर्जतचे प्रांताधिकारी अजित थोरबोाले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे तहसीलदार आगळे व दौंडचे तहसीलदार संजय पाटील, निवासी नायब तहसीलदार अभिजित दिवटे, मंडल अधिकारी वरवंड, नितीन मक्तेदार, मंडल अधिकारी सुनील जाधव, तलाठी सचिन जगताप, संतोष इडोळे, खरात, विश्वास राठोड, धुळाजी केसकर,अशोक नरोड यांनी ही कारवाई केली.

Back to top button