श्रीरामपूर : कांदा उत्पादक शेतकरी, व्यापार्‍यांना न्याय द्या | पुढारी

श्रीरामपूर : कांदा उत्पादक शेतकरी, व्यापार्‍यांना न्याय द्या

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर- राहुरी दरम्यान रेल्वे खात्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांना रॅक उपलब्ध करून द्यावी, अशी एकमुखी मागणी कांदा उत्पादक शेतकरी व शेकडो व्यापार्‍यांनी केली आहे. याप्रश्नी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खा. डॉ. सुजय विखे पा. यांना नगर येथील भेटीत शेतकरी व व्यापार्‍यांनी विस्तृत निवेदन सादर केले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व व्यापार्‍यांनी मंत्री दानवे व खा. डॉ. विखे यांना दिलेल्या निवेदनात हकीगत कथन केली. गेल्या अनेक वर्षांपासून अकोले ते नेवासा व गोदाकाठाच्या वैजापूरसह अनेक भागात कांदा खूप मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्व मदार कांदा उत्पादक शेतकरी व व्यापार्‍यांवर आहे, मात्र आजपर्यंत त्यांना अपेक्षित मोबदला कधी मिळाला नसल्याकडे ना. व खासदारांचे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

श्रीरामपूर ते राहुरी दरम्यान रेल्वे खात्याला सहज उपलब्ध होईल तेथे तातडीने परप्रांतात कांदा पाठवण्यासाठी रॅक उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल व शेतकरी, व्यापार्‍यांना फायदा मिळेल. श्रीरामपूर बाजार समितीतील कांदा दक्षिण भारतात जात असला तरी ट्रकमधून कांदा पाठविण्यास उत्पादक शेतकरी व व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर खर्च करावा लागतो.

व्यापार्‍यांना हा कांदा पाठवण्यास होणारा खर्च परिणामी शेतकर्‍यांच्या कांद्यांमधून वसूल केला जातो. यातून शेतकरी व व्यापार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. परप्रांतात कांदा पाठवण्यास काही दलालांना हाताशी धरावे लागते. यातून काहींकडून फसवणूक झाल्यास आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागते. त्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापार्‍यांना बसतो, याकडे लक्ष वेधले.

श्रीरामपूर बाजार समितीतील कांदा व्यापारी सुनील भवर, भाऊ थेटे, जितेंद्र गदिया, विजय छाजेड, किशोर कालंगडे या व्यापार्‍यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे व खा. डॉ.विखे पा. यांना निवेदन देत व्यापार्‍यांची होणारी हेळसांड व कुचंबना थांबवा, अशी आग्रही मागणी केली.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती शरद नवले यांनी स्वतंत्ररित्या याबाबत निवेदन रेल्वे राज्यमंत्री दानवे व खा. डॉ. विखे पा. यांना दिले. श्रीरामपूर येथे अनेक तालुक्यांचा कांदा विक्रीसाठी आणला जातो.येथील व्यापारी व सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांना भविष्यात चांगले दिवस येण्यासाठी रेल्वे खात्याने रॅक तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी नवले यांनी मागणी केली. यावेळी मुकूंद लबडे, महेश खरात, प्रवीण लिपटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

नाशिकप्रमाणे सुविधा उपलब्ध करा..!
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या भावात मोठी तफावत आढळते. नाशिक येथून पर प्रांतात कांदा पाठवण्यास थेट रेल्वेने रॅक उपलब्ध करून दिली. तशी सोय श्रीरामपूर येथून कांदा पाठवण्यास अद्याप उपलब्ध नसल्याकडे कांदा व्यापारी व शेतकर्‍यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे व खा. डॉ. सुजय विखे पा. यांचे लक्ष वेधले.

Back to top button