कर्जत : मतदारसंघात दबावतंत्राचे राजकारण चालू देणार नाही, रोहित पवार यांनी साधला आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा | पुढारी

कर्जत : मतदारसंघात दबावतंत्राचे राजकारण चालू देणार नाही, रोहित पवार यांनी साधला आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अनेक गावांसाठी जलजीवन योजनेतंर्गत नवीन पाणीयोजना मंजूर केली असून, तीन महिन्यांपूर्वी कार्यारंभ आदेश दिला आहे. मात्र, माजी मंत्री राम शिंदे यांनी ही सर्व कामे रोखली आहेत. त्यामुळे काम सुरू होण्यास विलंब होत आहे. यात गोरगरीब जनतेचे हाल होत आहेे. मात्र, अशा पद्धतीने कोणी दबाव तंत्राचे राजकारण करू नये, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. पाण्याअभावी कर्जत-जामखेड मतदारसंघातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो, हे पाहून आमदार होण्यापूर्वी रोहित पवार यांनी प्रत्येक गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा शब्द निवडणुकीत दिला होता. त्यानुसार आमदार झाल्यानंतर त्यांनी शब्द पाळत जलजीवन मिशन योजनेंतर्गत मतदारसंघातील सर्व गावांचा समावेश करून घेतला.

पाणीयोजना मंजूर झाली आणि कार्यारंभ आदेशही तीन महिन्यांपूर्वी निघाले, पण अजूनही कोंभळीसह 12 गावे, मिरजगाव आणि खर्डा येथील जनता तहानलेलीच आहे. कारण कार्यारंभ आदेश निघून 3 महिने झाले, तरी प्रत्यक्षात काम सुरू नव्हते. परंतु याबाबत शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित विभागाकडे आ. पवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे नुकतेच मिरजगावचे काम सुरू झालेे. कोंभळी येथे पाईप आणण्यात आले. या कामाची शुक्रवारी आमदार पवार यांनी पाहणी केली.

आमदार पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाण्याची गंभीर समस्या सोडविण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून सर्वेक्षण करून घेतले व मतदारसंघात कोट्यवधींची पाणीयोजना मंजूर करून आणली. त्यासाठीचा पाठपुरावा शासनदरबारी केल्याचे सर्वश्रूत आहे. त्यामुळे मतदारसंघातील विविध भागातील पाण्याची अडचण दूर होेत आहे. परंतु काही जणांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अधिकारी व कंत्राटदारांवर दबाव आणला जात असल्याने काम थांबले आणि त्याचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत आ. शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. कोणी दबावाचे राजकारण करत जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल, तर त्यांच्या तोंडचं पाणी पळविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात आमदार पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.

Back to top button