रुपाली चाकणकर : ‘तर तुमचे गाल आणि थोबाड रंगविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही’ - पुढारी

रुपाली चाकणकर : ‘तर तुमचे गाल आणि थोबाड रंगविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही’

निघोज (नगर); पुढारी वृत्तसेवा : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला.

तुमची दुकानदारी चालवत असताना, तुम्ही आम्हाला नावे ठेवू नका. तुमचे घर चालविण्यासाठी आम्ही तेवढे सहकार्य ठेवतो. मात्र तुम्ही जर राज्यातील महिलांचा अपमान करणार असाल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. तुम्ही तमाम महिलांची जाहीर माफी मागा. अन्यथा आम्ही तुमचे गाल आणि थोबाड रंगविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात चाकणकर यांनी दरेकरांवर हल्ला चढविला.

नगर जिल्ह्यातील निघोज येथे एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. चाकणकर म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सामान्य जनतेचा पक्ष आहे. वैचारीक वारसा चालविणारा, सामान्य माणसाला आपलासा वाटणारा हा पक्ष आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवित असताना आमच्या पक्षाला मिळणारे यश विरोधकांना पहावत नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कधी पडेल, याची दररोज वाट पाहणार्‍या विरोधकांचा आता हिरमोड झाला आहे. त्यांचे घर चालविण्यासाठी आम्ही मदत करतोच आहोत. मात्र, स्वतःला मूल होत नसल्याने दुसर्‍याचे बाळ पाळण्यात टाकणार्‍यांसारखी विरोधकांची अवस्था झाल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.

Back to top button